चार अपत्ये...एक वाढदिवस
एखाद्या दांपत्याला भरपूर मुलेबाळे असली (अलिकडच्या काळात असे असणे अवघडच) तर त्यांचे वाढदिवस लक्षात ठेवणे हे मातापित्यांसाठी एक अवघड काम असते, अशी स्थिती आहे. तथापि, अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाच्या अॅपल व्हॅली नामक भागात वास्तव्य करणाऱ्या न्यूहेझ ड्रेक नामक मातेला ही चिंता करावी लागत नाही. या मातेला चार अपत्ये आहेत. ती सर्व एकेकटी जन्मली आहेत. म्हणजेच ती जुळी, तिळी किंवा चौपाळी नाहीत. तरीही या मातेला त्यांचे वाढदिवस लक्षात ठेवण्यासाठी फारसे प्रयत्न करावे लागत नाहीत. कारण या सर्व अपत्यांचा वाढदिवस एकाच दिनांकाला येतो. केवळ जन्मवर्ष वेगवेगळे आहे. विशेष बाब अशी की, सर्व चार अपत्यांचा जन्म अशा एकाच दिनी व्हावा, या साठी या महिलेने कोणतेही ‘प्लॅनिंग’ केलेले नाहाहृ किंवा हा मंत्रतंत्राचाही प्रकार नाही. तसेच या महिलेने शस्त्रक्रिया करुन घेऊनही हे साध्य केलेले नाही.
हा एक नैसर्गिक चमत्कार मानला जात आहे. या सर्व अपत्यांचा वाढविदस 7 जुलै या एका दिवशी येतो. या मातेला किवान (जन्म 2019), नजायला (जन्म 2021), खलान (2022) आणि केलोव्हा (2025) अशी चार अपत्ये आहेत. ही सर्व अपत्ये 7 जुलै या एकाच दिवशी जन्मलेली आहेत. असा प्रकार जगात आतापर्यंतच्या ज्ञात इतिहासात अगदी क्वचितच घडला असण्याची शक्यता आहे.
कोणत्याही वैद्यकीय हस्तक्षेपाशिवाय, एका दिनांकाला अशी चार अपत्ये एकेकटी जन्मणे, ही संभावना जवळपास नाही. कोट्यावधी जोडप्यांमधून एखादेवेळेस असे घडू शकेल. सध्यातरी साऱ्या जगात या महिलेशिवाय अन्य कोणी महिला अशा प्रकारे माता झालेला प्रकार ज्ञात नाही, असेही अनेकांचे म्हणणे आहे. या महिलेच्या कुटुंबालाही हा आश्चर्याचा धक्का असून ते या संदर्भात नवल व्यक्त करतात. या महिलेची माहिती आता सोशल मिडियावरही प्रसिद्ध झाली असून अनेकांनी ती पाहिली आहे. अनेकजण या मातेला भाग्यवान समजत आहेत. सात या क्रमांकावर या महिलेने लॉटरी लावावी. तिला जॅकपॉट लाभेल. कारण सात हा तिचा ‘लकी नंबर’ दिसतो, अशाही कॉमेंटस् केल्या जात आहेत. या माता स्वत:च इतकी आश्चर्यचकित आहे, की तिला काही बोलणेही अशक्य झाले आहे.