एकाच वेळी चार अपत्यांना जन्म
मातृत्व प्राप्त होणे ही प्रत्येक महिलेसाठी आनंदाची बाब असते, असे मानण्याचा प्रघात आहे. बहुतेकवेळा ही बाब खरीही असते. तथापि, आई होण्यासाठी मातृवेणा सहन कराव्या लागतात. अपत्याचा जन्म झाल्यानंतर त्याचे संगोपन करुन त्याला स्वत:च्या पायावर उभे करेपर्यंत मातेचे परिश्रम संपत नाहीत. प्रत्येक माता हे सर्व कष्ट अत्यंत निरपेक्ष भावनेने आपल्या अपत्यासाठी सहन करते.
अमेरिकेत रकेव टॉवलर नामक 33 वर्षांच्या महिलेने 23 मार्च 2023 या दिवशी एकाचवेळी चार अपत्यांना जन्म दिला आहे. तिला यापूर्वी झालेला एक पुत्रही आहे. अशा प्रकारे तीन गेल्या पाच वर्षांमध्ये चार अपत्यांना जन्म दिला आहे. जेव्हा तिने चार अपत्यांना एकाचवेळी जन्म दिला, तेव्हा या सर्व अपत्यांना काही महिने इन्क्युबेटरमध्ये ठेवावे लागले होते. पण आता ही सर्व अपत्ये प्रकृतीने ठीकठाक आहेत. आता ही सर्व अपत्ये मातेसह आपल्या घरी आली आहेत.
या चार नवजात अपत्यांना मोठे करणे हे तिच्यासमोरचे एक आव्हान बनले आहे. माता बनण्याचा आनंद तिलाही झाला आहे. पण तिच्या म्हणण्यानुसार देवाने तिला तो इतका दिला की, ती अक्षरश: वैतागली आहे. तिचा सारा वेळ मुलांचे करण्यातच जाते. तिला दिवसाकाठी 30 वेळा दुधाच्या बाटल्या धुवाव्या लागतात. 30 वेळा मुलांचे कपडे बदलावे लागतात. ते धुवावे लागतात. यात आनंद असला तरी यामुळे आपले जीवनच जणू ‘नरक’ बनले आहे, असे तिचे म्हणणे आहे.