कुख्यात शूटरच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक
विजापूर पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांची माहिती : विजापूर जिल्ह्यातील तिघे तर एक बैलहोंगलचा
वार्ताहर/विजापूर
जिह्यातील भीमा नदीकाठ परिसरातील अनेक गुह्यांमध्ये सहभागी कुख्यात शूटर भागप्पा हरिजनच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी दिली. यामध्ये इंडी तालुक्यातील अगरखेड गावातील प्रकाश ऊर्फ पिंटू लक्ष्मण मेलिनकेरी (वय 26), इंडी तालुक्यातील होर्ती गावातील राहुल भीमाशंकर तलकेरी (वय 20), इंडी तालुक्यातील अगरखेडचा सुदीप रेणुका कांबळे (वय 20) तर बैलहोंगल येथील मणिकंठ उर्फ गडिगेप्पा शंकरप्पा बेनकोप्प (वय 27) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असल्याचेही त्यांनी सांगितले.11 फेब्रुवारी रोजी रात्री 10 च्या सुमारास पिंटू आणि इतर चार-पाच जणांनी एकत्र येऊन भागप्पावर पिस्तूलातून गोळ्dया झाडून आणि नंतर कुऱ्हाडीने आणि चाकूने त्याच्या मानेवर, छातीवर आणि हातावर वार करून त्याची हत्या केली होती. याप्रकरणी मृताची मुलगी गंगूबाई हिने गांधी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
अलिकडेच, विजापूर शहरात रवी मल्लिनकेरी या तरुणाची हत्या तुलसीराम हरिजन आणि त्याचे सहकारी अॅलेक्स गोल्लर, षण्मुख नडविनकेरी, प्रकाश गोल्लर, मुरुगेश उल्लागडी आणि राजेसाब रुद्रवाडी यांनी केली होती. हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर भागप्पा हरिजन आणि रवी मेलिनकेरी हे नातेवाईक असून दोघांमध्ये काही वर्षांपासून आर्थिक व्यवहार सुरू होते. दोघे मिळून रिअल इस्टेटचा व्यवसाय करीत होते. रवी मेलिनकेरीच्या मृत्यूनंतर, रवी मेलिनकेरीचा धाकटा भाऊ प्रकाश मेलिनकेरी यास भागप्पा हरिजन याने तुझा भाऊ माझे नाव सांगून पैसे, मालमत्ता आणि वाहन घेतले आहे. ते सर्व मला परत दे असा प्रकाशवर दबाव आणत होता. याप्रकरणी त्याने प्रकाश याला अनेकवेळा धमकीही दिली होती.तसेच भागप्पा याने प्रकाशला तुम्ही ती मालमत्ता द्यावी. अन्यथा, तुम्हाला 10 कोटी द्यावे लागतील असे सांगितले होते. तसेच त्याच्या भावाच्या पत्नीबद्दलही असभ्य भाषा वापरत होता. मी तुझ्या भावाला कसे मारले आहे. तसेच तुलाही अशाचप्रकारे मारण्याची धमकी त्याने दिली होती. हाच राग मनात ठेवून प्रकाश मेलिनकेरीने नातेवाईक आणि मित्रांसह भागप्पाची निर्घृण हत्या करण्याचा कट रचला आणि भागप्पा हरिजनची हत्या केली होती. आरोपींनी गुह्यात वापरलेली शस्त्रs आणि वाहने जप्त करण्यात आली आहेत. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी सांगितले.