चडचण बँक दरोड्यातील चौघांना अटक
दरोडेखोरांना पिस्तूल पुरविणाऱ्या बिहारमधील तिघांना अटक : मास्टरमाईंड महाराष्ट्रातील : 9.01 किलो सोने, 86.31 लाख जप्त
विजापूर- बेळगाव
चडचण एसबीआय बँकेवर झालेल्या दरोडा प्रकरणाचा विजापूर पोलिसांनी छडा लावला आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या बिहारच्या तिघाजणांसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा मास्टरमाईंड महाराष्ट्रातील एक व्यक्ती असल्याचे उघड झाले आहे. मात्र, चौकशीच्या दृष्टीने त्याचे नाव अद्याप उघड केलेले नाही, अशी माहिती कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक आर. हितेंद्र यांनी दिली. बँक दरोडाप्रकरणी हितेंद्र यांनी माहिती दिली.
यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख रामनगौडा हट्टी व इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते. राकेशकुमार शिवाजी साहनी (वय 22), राजकुमार रामलाल पासवान (वय 21), रक्षकुमार मदन माथो (वय 21) अशी आरोपींची नावे आहेत. ते तिघेही बिहार राज्यातील समस्तीपूरचे रहिवासी आहेत. या बँक दरोड्यातून एकूण 9.01 किलो सोने आणि 86,31,222 ऊ. रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. उर्वरित सोने आणि रोकड लवकरच शोधून काढण्यात येणार आहे. या प्रकरणातील आणखी काही आरोपी अद्याप फरारी आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या दरोड्याचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहेत. प्रमुख सूत्रधार महाराष्ट्रातील आहे.
16 सप्टेंबर 2025 रोजी चडचण एसबीआय बँकेत दरोडा टाकण्यात आला होता. या दरोड्यात 20 किलो सोने आणि 1 कोटीहून अधिक रोकड लुटून आरोपी पसार झाले होते. सुगाव्याच्या आधारे तपास पथकाने त्वरित घटनास्थळी धाव घेत कारमधून 888.33 ग्रॅम सोने असलेल्या 21 पॅकेट्स आणि 1,03,160 रोख रक्कम जप्त केली होती. तसेच, सोलापूर जिल्ह्यातील हुलजंती गावातील एका बंद घराच्या छतावर आरोपींनी टाकलेली बॅग जप्त करण्यात आली होती. त्यात 6.54 किलो सोने आणि 41,03,000 रोख रक्कम मिळाली होती. हुलजंती गावातील 15 जणांकडून पोलिसांनी एकूण 1.587 किलो सोने आणि 44,25,060 रोख रक्कम देखील जप्त केली आहे. या गुह्याचा तपास जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या नेतृत्वाखाली व अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख रामनगौड हट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. तपासात डीवायएसपी जगदीश एच. एस., सुनील कांबळे, पोलीस अधिकारी सुरेश बेंडे, एम. एम. उप्पीन, रमेश अवजी, राकेश बगली, श्रीकांत कांबळे, मनगूळी, एन.जी. अप्पानायकर,सोमेश गेज्जी, मंञुनाथ तिरकन्नवर, अरविंद अंगडी, देवराज उळागड्डी अधिकारी सहभागी झाले होते.
मनगुळी बँक दरोडा प्रकरणातील चोरट्याचा शोध सुरु
मे महिन्यात मनगुळीतील कॅनरा बँकेत घडलेल्या दरोडा प्रकरणात आतापर्यंत 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी 43.565 किलो सोने 1.38 कोटी रोकड गुह्यासाठी वापरलेले 5 कारसह एकूण 44.48 कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाबाबत अधिक माहिती देताना कायदा-सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक हितेंद्र म्हणाले, अटकेत असलेल्या आरोपींना पोलीस कोठडीत घेऊन कसून चौकशी केली जात आहे. त्यांच्या माहितीच्या आधारे अधिक 4.8 किलो सोने आणि 22 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. मात्र, अजून एक आरोपी फरार असून, त्याच्या अटकेसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. कॅनरा बँकेत दरोडा टाकून आरोपींनी सुमारे 53.26 कोटी रुपये किमतीचे 58.97 किलो सोने (58,976.94 ग्रॅम) आणि 5,20,450 रोकड लंपास केली होती. पोलीस खात्याने अतिशय चाणाक्षतेने तपास करून या गुह्याचा यशस्वी छडा लावल्याचे त्यांनी सांगितले.
अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांच्या घरात झालेल्या चोरी प्रकरणाचाही पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणी तिघाजणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी दिली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सुनील राजपूत (वय 28, रा. रामापूर तांडा ता. रामदुर्ग, जि. बेळगाव), चेतन पांडू लमाणी (वय 28 नागनूर तांडा, रामदुर्ग जवळ), राहुल परशुराम लमाणी (वय 23) रा. कारलकट्टी ता. सौंदत्ती अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 250 ग्रॅम सोन्याचे दागिने, 50 ग्रॅम चांदीचे दागिने, 2 स्विफ्ट कार, 2 मोटरसायकल्स आणि 4 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. 24 ऑगस्ट रोजीच्या घरफोडीतील आरोपींनी एकूण 30,14,500 किमतीचे सोने व चांदीचे दागिने चोरून नेले होते. त्यातील चोरट्यांना अटक करुन त्यांची कसून चौकशी केली जात आहेत.
मंगळवेढ्यात कार चोरी
चडचण एसबीआयवरील दरोड्यासाठी दरोडेखोरांनी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवाढा येथून कार चोरल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. चोरीच्या कारचा दरोड्यासाठी वापर करण्यात आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्रातील एका प्रमुख गुन्हेगाराची धरपकड करण्यात आली आहे. ज्या बिहारी त्रिकूटाला अटक करण्यात आली आहे, त्यांनी दरोड्यासाठी पिस्तूल पुरविल्याचे पोलीस तपासात सामोरे आले आहे. बिहारी तरुणांनी दिलेल्या गावठी पिस्तुलांचा वापर दरोडेखोरांनी केला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी विजापूर पोलिसांचे एक पथक नेपाळपर्यंत पोहोचले होते. या टोळीकडून आतापर्यंत 9.01 किलो सोने, 86 लाख 31 हजार 220 रु. रोकड जप्त करण्यात आले आहे. फरारी आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.