हेरॉईन विकणाऱ्या चौघांना छापा टाकून अटक
25 ग्रॅमहून अधिक हेरॉईन जप्त : सीसीबी-खडेबाजार पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावात हेरॉईन विकणाऱ्या चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. सीसीबी व मार्केट पोलिसांनी ही कारवाई केली असून या चौकडीकडून 25 ग्रॅमहून अधिक हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
सीसीबीचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी तांगडी गल्ली रेल्वेगेटजवळ विश्वनाथ रवी गोटडकी (वय 28) राहणार भांदूर गल्ली, मयुर सुभाष राऊत (वय 31) राहणार महाद्वार रोड या दोघा जणांना अटक करून त्यांच्याजवळून 14.63 ग्रॅम हेरॉईन जप्त केले आहे. 130 पुड्यांमध्ये ते बांधून ठेवण्यात आले होते.
जप्त हेरॉईनची किंमत 33 हजार रुपये इतकी होते. 30 हजार रुपये किमतीचा एक मोबाईल फोन, लावा कंपनीचा आणखी एक मोबाईल फोन असा एकूण 64 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा साठा आपण मुंबई कोळीवाडा येथील ‘अम्मा’कडून आणल्याची कबुली या जोडगोळीने दिली आहे. त्यामुळे विश्वनाथ व मयुरबरोबरच मुंबईच्या ‘अम्मा’वरही खडेबाजार पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई मार्केट पोलिसांनी कामत गल्लीजवळील कार पार्किंगनजीक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक हुसेनसाब केरुर व त्यांच्या सहकाऱ्यांनी वकारअहमद रफिक नाईकवडी (वय 30) राहणार उज्ज्वलनगर, रोशनजमीर अब्दुलरऊफ मुल्ला (वय 25) राहणार उज्ज्वलनगर या दोघा जणांना हेरॉईन विकताना अटक केली आहे. त्यांच्याजवळून 11.39 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. या दोघा जणांवर मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.