पिस्तुलचा धाक दाखवून लुटणाऱ्या चौघांना अटक! शाहुपूरीत परिसरात शनिवारी भरदिवसा घडली होती घटना
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी लावला गुन्हा छडा
कोल्हापूर प्रतिनिधी
शाहूपुरी परिसरातील व्यावसायिकाच्या कार्यालयात पिस्तुल आणि चाकूचा धाक दाखवून 13 लाख 29 हजार रुपयांची रोकड तीन दिवसांपूर्वी लुटली होती. या गुह्याचा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने छडा लावला आहे. याप्रकरणातील चौघा संशयितांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून 11 लाख 35 हजार 200 ऊपये, 10 लाखांच्या दोन चारचाकी गाड्या, एक मोपेड, तीन मोबाईल, गुह्यात वापरलेली एअर पिस्तुल, चाकू असा 32 लाख 21 हजार 40 ऊपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली. यावेळी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर उपस्थित होते.
याप्रकरणी अमरजित अशोक लाड (वय 41, रा. लाईन बझार, कसबा बावडा), अभिषेक विजय कागले (वय 31), त्याचा चुलत भाऊ आशिष निळकंठ कागले (वय 37), बाळकृष्ण श्रीकांत जाधव (वय 35, तिघे रा. पाचगाव, ता. करवीर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या चौघांना मंगळवारी दुपारी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अमरजित लाड यांचे पुलाची शिरोली औद्योगिक वसाहतनजीक बांधकाम साहित्य विक्रीचे दुकान आहे. तर संशयित अभिषेक कागले, आशिष कागले, बाळकृष्ण जाधव हे फॅब्रीकेशनची कामे करत होते.
पोलीस उपअधीक्षक टिके म्हणाले, शाहूपुरीमधील साईक्स एक्सटेन्शन, गजलता ऑर्केडमध्ये बांधकाम साहित्य विक्री व्यावसायिक ललित बन्सल (रा. नागाळा पार्क, कोल्हापूर) यांचे कार्यालय आहे. ते आठवड्यातून एक किंवा दोन दिवस सुरू असते. व्यावसायिक बन्सल यांच्याकडे कार चालक म्हणून लक्ष्मण कानेकर त्याची देखरेखीची जबाबदारी आहे. 17 ऑगस्ट रोजी भरदुपारी कानेकर कार्यालयात एकटेच असताना तोंडाला मास्क लावलेले हेल्मेटधारक दोन तरूण घुसले. त्यांनी पिस्तुल आणि चाकूचा धाक दाखवून कार्यालयातील खुर्चीला बांधून बेदम मारहाण केली. तसेच ड्रॉव्हरचे कुलूप काढून त्यामधील 13 लाख 29 हजार 400 रुपयांची रोकड लुटली होती.
या प्रकाराची पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गांभीर्याने दखल घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला तपासाबाबत आदेश दिले होते. यासाठी पोलिसांनी वेगवेगळी आठ पथके तैनात केली होती. तपासी पोलीस पथकाला संशयिताचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले. याचा आधार घेऊन या लुट प्रकरणातील संशयितांची नावे निष्पन्न केली. या प्रकरणातील चार पैकी तिघे संशयित पाचगावनजीकच्या एका बारमध्ये येणार असल्याची माहिती त्यांना खबऱ्याकडून समजली. त्यावऊन त्या बारवर छापा टाकून अभिषेक कागले, आशिष कागले, बाळकृष्ण जाधव यांना अटक केली. त्यांच्याकडे कसून चौकशी सुऊ केली. दरम्यान अमरजित लाड यालाही अटक केली.
अटक केलेल्या संशयितांकडे लाखो रुपयांची लूट कोठे लपवली आहे, याविषयी चौकशी सुऊ केली. चौकशीमध्ये त्यांनी लुटीतील 13 लाख 29 हजार 400 रुपयांपैकी 1 लाख 94 हजार 200 ऊपये खर्च केले असून, अन्य रक्कम त्यांनी पाचगाव येथे लपवल्याची माहिती दिली. त्यावऊन पोलिसांनी 11 लाख 35 हजार 200 ऊपयांच्या रोकडसह दोन चारचाकी गाड्या, एक मोपेड, तीन मोबाईल हॅण्डसेट, एअर पिस्तुल, चाकू असा मुद्देमाल जप्त केला.
मिळालेल्या टीपनंतरच लूट
संशयीत अमरजित लाड, अभिषेक कागले, आशिष कागले, बाळकृष्ण जाधव हे चौघे कर्ज बाजारी होवून आर्थिक अडचणीत आले होते. यावेळी लाड यांने आशिष कागलेला ललीत बन्सल यांच्या कार्यालयात लाखो ऊपयांची रोकड जमा होत असल्याची माहिती देऊन ही रोकड लुटण्याची टिप दिली. आशिषने या लुटमारीमध्ये चुलत भाऊ अभिषेक कागले, बाळकृष्ण जाधव यांना सामावून घेऊन, त्यांच्या मदतीने भरदिवसा लाखो ऊपये लुटले.