आंतरराज्य घरफोडी करणाऱ्या चौघांना अटक
सांगली :
जत, विटा, चिंचणी वांगी, इस्लामपूर व आटपाडी परिसरात बंद दुकान व बंद घरे फोडून चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलीस पथकाने अटक केली. त्याच्याकडून एकूण ११ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. चोरीतील सोने चांदी विक्रीसाठी जाताना सापळा रचून अटक करण्यात आली.
यामध्ये सोने, चांदीचे दागिने, चारचाकी गाडीसह २६ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अटक केलेल्यापैकी एकावर महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. अटक केलेल्यामध्ये संतोष तुळशीराम चव्हाण, आशुतोष संतोष चव्हाण, दोघेही रा. एकता नगर, सातारा रोड, जत, करण अर्जुन चव्हाण, रा होनसळ, ता सोलापूर, व पांडुरंग सुनिल पवार, रा होटगी, ता सोलापूर यांचा समावेश आहे.
याबाबत माहीती अशी, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतिश शिदे यांच्या आदेशानुसार सहा. पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथकास जत परिसरात चोरीतील माल विक्रीसाठी काही चोरटे येणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार सिकंदर वर्धन यांचे पथकामधील पोलिस प्रमोद साखरपे, हेडकॉन्स्टेबल हणमंत लोहार, नाईक सोमनाथ गुंडे यांनी जत ते कवठेमहांकाळ रोडवर जाधव वस्ती येथील रज्जाक नगारजी यांचे बंद हॉटेल सानिया गार्डन येथे सापळा लावला.
त्या ठिकाणी काही वेळातच संतोष चव्हाण, त्यांचा मुलगा आशुतोष तसेच करण चव्हाण व पांडुरंग पवार असे चौघे पांढ-या रंगाच्या चारचाकीने तेथे आले. सिंकदर वर्धन व पथकाने सदर गाडीजवळ जावून चौघांनाही पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेवून त्यांच्याकडे चौकशी केली. त्यांच्यासह गाडीची तपासणी केली असता एक कापडी पिशवीमध्ये सोन्याचे व चांदीचे दागिने व मागील बाजूस स्टीलची पाईप, कटावणी, चाकू, पाना, स्कू ड्रायव्हर, बॅटरी, मास्क, हॅन्डग्लोज इत्यादी साहित्य मिळून आले.
याबाबत विचारणा केली असता त्यांनी जत, विटा, इस्लामपूर, चिंचणी वांगी व आटपाडी परिसरात बंद घरे तसेच दुकान फोडून घरफोडी चोरी केली असून त्या गुन्हयातील चोरीचा मुद्देमाल विकण्यासाठी घेऊन जात असलेबाबत कबुली दिली. हे आरोपी पुढील तपास कामी जत पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यांचा तपास जत पोलीस करत आहेत.
- संतोष चव्हाण रेकॉर्डवरील गुन्हेगार
आरोपी संतोष तुळशीराम चव्हाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर जत पोलीस ठाणे व कर्नाटकात घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या या कामात त्याचा मुलगा आशुतोषही सहभागी आहे. या चौघांकडून अनेक गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता आहे.