For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आसाममध्ये माँ कामाख्या कॉरिडॉरची पायाभरणी ! काशी आणि महाकाल कॉरिडॉरप्रमाणे होणार विकसित

06:57 AM Feb 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
आसाममध्ये माँ कामाख्या कॉरिडॉरची पायाभरणी   काशी आणि महाकाल कॉरिडॉरप्रमाणे होणार विकसित
Advertisement

: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

Advertisement

वृत्तसंस्था/ गुवाहाटी

आसाम भेटीवर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी गुवाहाटी येथे पोहोचले. पंतप्रधान मोदींनी रविवारी 11,600 कोटी रूपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. पंतप्रधान मोदी रविवारी खानापारा येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानात एका विशाल जनसभेला संबोधित केले. याप्रसंगी पंतप्रधानांनी पायाभरणी केलेल्या प्रकल्पांमध्ये ‘माँ कामाख्या कॉरिडॉर’ या पंतप्रधानांच्या ईशान्य क्षेत्र विकास उपक्रमातील महत्त्वपूर्ण योजनेचा समावेश आहे. या कामाख्या मंदिरामुळे येथे येणाऱ्या भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी ईशान्य भारत दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी गुवाहाटी येथील खानापारा पशुवैद्यकीय क्षेत्रात पोहोचले. येथे पंतप्रधानांनी 11,600 कोटी रूपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यानंतर पंतप्रधानांनी येथे मोठ्या जनसभेला संबोधित करत आसाममधील भाजपच्या निवडणूक रणनितीची घोषणाही केली. आज पायाभरणी करण्यात आलेले प्रकल्प नजिकच्या काळात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करतील. विकास आणि वारसा हे आमच्या सरकारचे धोरण आहे. आसाममधील डबल इंजिन सरकार केवळ विकासाच्या धोरणावर काम करते, असे पंतप्रधानांनी उपस्थितांना सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यावर शनिवारी गुवाहाटी येथे पोहोचले. राज्यपाल गुलाबचंद कटारिया आणि मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. गुवाहाटी येथील खानापारा येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी एक लाख मातीचे दिवे लावले. त्याआधी पंतप्रधान मोदींनी गुवाहाटीमध्ये भव्य रोड शो केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात 11 हजार कोटी रूपयांच्या प्रकल्पांच्या उद्घाटनामुळे आसाम आणि ईशान्येचा दक्षिण आशियातील इतर देशांशी संपर्क मजबूत होईल. या प्रकल्पांमुळे पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढतील. अयोध्येनंतर मी कामाख्या मातेच्या दारी आलो असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. आज पुन्हा एकदा कामाख्या आईच्या आशीर्वादाने मला आसामच्या विकासाशी संबंधित प्रकल्प तुमच्या हाती सोपवण्याचे सौभाग्य मिळाले आहे. या सर्व प्रकल्पांमुळे या प्रदेशाचा आसाम आणि ईशान्येकडील तसेच दक्षिण आशियातील इतर देशांशी संपर्क आणखी मजबूत होईल. कामाख्या मातेचे मंदिर पूर्ण झाल्यानंतर ते देशभरातील आणि जगभरातील भक्तांना आपल्याकडे आकर्षित करेल, असेही पंतप्रधान म्हणाले.

विकास-समृद्धीकडे वाटचाल

आमची तीर्थक्षेत्रे, मंदिरे, श्र्रद्धास्थाने ही केवळ भेट देण्याची ठिकाणे नाहीत. आपल्या संस्कृतीच्या हजारो वर्षांच्या प्रवासाची ही अमिट श्रद्धास्थाने आहेत. प्रत्येक संकटाचा सामना करताना भारत कसा खंबीरपणे उभा राहिला याची ही साक्ष आहे. कोणताही देश आपला भूतकाळ मिटवून आणि विसरून कधीच विकास करू शकत नाही. गेल्या 10 वर्षात भारतातील परिस्थिती बदलल्याचे मला समाधान आहे. भाजपच्या डबल इंजिन सरकारने ‘विकास आणि वारसा’ हा आपल्या धोरणाचा भाग बनवल्यामुळे देश प्रगतीकडे वाटचाल करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

आसाममध्ये भाजप सरकारच्या आधी फक्त 6 वैद्यकीय महाविद्यालये होती, तर आज 12 वैद्यकीय महाविद्यालये आहेत. आसाम हे आज ईशान्येकडील पॅन्सर उपचारांचे प्रमुख केंद्र बनले आहे. गेल्या 10 वर्षात आम्ही विद्यापीठे आणि महाविद्यालये बांधली आहेत. पूर्वी मोठ्या शहरांमध्येच मोठ्या संस्था उभ्या केल्या जात होत्या. आम्ही संपूर्ण देशात आयआयटी, आयआयएम आणि एम्सचे जाळे पसरवले असून गेल्या 10 वर्षांत वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या दुप्पट झाली आहे, असे ते म्हणाले.

अनेक प्रकल्पांची पायाभरणी...

498 कोटींच्या माँ कामाख्या कॉरिडॉर प्रकल्पासह 3,250 कोटी ऊपये खर्चून अत्याधुनिक पायाभूत सुविधांसह उत्तम आरोग्य सुविधा उभारण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. तसेच 832 कोटी ऊपये खर्चून क्रीडाप्रेमींसाठी जागतिक दर्जाचे फुटबॉल स्टेडियम उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याव्यतिरिक्त चंद्रपूर स्टेडियममध्ये 300 कोटी ऊपये खर्च करून अॅस्ट्रो टर्फ फुटबॉल स्टेडियमसह आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा पुरविल्या जाणार आहेत. वैद्यकीय आणि क्रीडाविषयक सुविधा देण्याबरोबरच विमानतळापर्यंतच्या रस्त्यांचे जाळे वाढवून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 384 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. राज्यात अन्यत्रही 3,444 कोटी ऊपये खर्चून 38 पुलांसह 43 रस्त्यांची सुधारणा केली जाणार आहे.

Advertisement
Tags :

.