चाळीस वर्षे दहावीतच...
सध्या बिहारमधील एका शालेय विद्यार्थ्याची कहाणी सर्वत्र चर्चिली जात आहे. या विद्यार्थ्याचे नाव मोहनलाल असे असून सध्या त्याचे वय 56 वर्षांचे आहे. इतक्या मोठ्या वयाचा विद्यार्थी असू शकेल, पण शालेय विद्यार्थी असू शकणार नाही, असे अनेकांचे मत असू शकते. तरीही तो शालेय विद्यार्थीच आहे. तो बिहारच्या सिवान जिल्ह्यातील एका सरकारी माध्यमिक शाळेत शिकत आहे. त्याने 1985 मध्ये प्रथम दहावीची परीक्षा दिली. तथापि, तो अपयशी ठरला. त्यानंतर आजपर्यंत प्रत्येक वर्षी त्याने दहावीची परीक्षा दिली आहे. तथापि, तो उत्तीर्ण होऊ शकलेला नाही. त्याने आपली ही अद्भूत कहाणी स्वत:च सोशल मिडियावर पोस्ट केली आहे. त्यामुळे तो प्रकाशात आला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार विशेष बाब अशी आहे, की त्याने कधीही शाळा सोडली नाही. आजही तो प्रतिदिन शाळेला जातो. कधीही शाळा चुकवत नाही. अभ्यासही करतो. तो गृहपाठही करतो. शिक्षकांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करतो. तथापि, त्याला दहावीच्या परीक्षेत तो यशस्वी होत नाही. त्याच्या शिक्षकांनाही याचे आश्चर्य वाटते. तो प्रथम 1985 मध्ये दहावीत गेला, तेव्हा त्याचे जे शिक्षक होते, ते सर्व आता निवृत्त झाले आहेत.
त्याच्या शिक्षकांची आता ही दुसरी पिढी आहे. अनेक शिक्षक स्वभाविकच त्याच्यापेक्षा वयाने बरेच लहान आहेत. इतक्या वेळा अपयशी ठरुनही त्याने दहावी होण्याचा निर्धार सोडलेला नाही. त्याने पोस्ट केलेला व्हिडीओ पाहून लोकांच्या मनात संमिश्र भावना निर्माण होतात. कोणी त्याला हा नाद सोडण्याचा आणि अन्य काहीतरी करण्याचा सल्ला दिला आहे. तर कोणी राज्याच्या शिक्षण विभागाला दोष दिला आहे. त्याला एकाच वर्गात इतकी वर्षे बसू कसे देण्यात आले ? हे नियमांच्या विरोधात नाही काय, असे प्रश्नही लोक विचारत आहेत. आज वयाच्या 56 व्या वर्षी मोहनलाल शाळेचा गणवेश परिधान करुन शाळेत दहावीच्या वर्गात बसलेला दिसून येतो. अक्षरश: शेकडो विद्यार्थ्यांनी गेली चाळीस वर्षे त्याच्यासह दहावीचा अभ्यास केला आहे. प्रत्येक वर्षी 30-40 विद्यार्थी त्याच्यासह दहावीला असतात आणि ते उत्तीर्ण होऊन जातात किंवा शाळा तरी सोडतात. पण मोहनलाल मात्र त्याच्या जागी ’ठाम’ आहे. त्याच्या या निग्रहाचे अनेक जण कौतुकही करतात. तर काहीजण त्याने असा वेळेचा अपव्यय करु नये, अशी सूचनाही करतात. दहावीच्या वर्गात 40 वर्षे शिक्षण घेणारा, तरीही उत्तीर्ण होऊ न शकलेला असा हा जगातील एकमेव असावा असे बोलले जात आहे.