लोकमान्य को-ऑप.सोसायटीतर्फे किल्ला स्पर्धांचे आयोजन
बेळगाव : लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्यावतीने लोकमान्य दिवाळी किल्ला स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा बेळगाव महानगरपालिका हद्द मर्यादित आहे. संस्थेच्या स्थापनेपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व गड-किल्ल्यांची माहिती व्हावी या उद्देशाने सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेस बेळगाव शहरातील तऊणांचा व बालचमूचा भरभरून प्रतिसाद मिळतो व बेळगाव शहरात शिवमय वातावरण निर्माण होते. सदर स्पर्धा बेळगाव विभाग 1, बेळगाव- विभाग 2, शहापूर, वडगाव, अनगोळ, टिळकवाडी अशा विभागात घेण्यात येणार आहेत. या स्पर्धा भरविण्याकरिता संस्थेचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर, उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक गजानन धामणेकर, पंढरी परब, सुबोध गावडे, विठ्ठल प्रभू, डॉ. दामोदर वागळे, सीईओ अभिजित दीक्षित यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
प्र्रत्येक विभागातील विजेत्यांना रोख बक्षिसे दिली जातील. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट किल्ल्यास गडांचा राजा हा किताब दिला जाईल. स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी आपल्या प्रवेशिका लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या कोनवाळ गल्ली, शहापूर, वडगाव, अनगोळ, टिळकवाडी, क्लब रोड शाखेत द्याव्यात. नावे नोंदविण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2024 आहे. दि. 11 नोव्हेंबरपासून परीक्षण सुरू होईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. प्रत्येक स्पर्धकांनी आपापल्या किल्ला प्रतिकृतींचे व्हिडीओ चित्रण करून ठेवावे. गरज भासल्यास परीक्षक व्हिडीओ चित्रण फीतची मागणी करू शकतात. अधिक माहितीसाठी राजू नाईक (9845427100), सतीश गोडसे (9353012003) आणि उमेश कासेकर (9353012002) यांच्याशी संपर्क साधावा. बेळगाव महानगरपालिका हद्दीतील किल्लाप्रेमींनी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.