कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

किल्ले अजिंक्यताऱ्याचे होणार संवर्धन

05:06 PM Jun 12, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

सातारा :

Advertisement

सातारा जिह्याच्या पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी अभ्यासपूर्ण पाठपुरावा करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून राजधानी साताऱ्यातील किल्ले अजिंक्यताराचे जतन, संवर्धन आणि परिसर सुशोभीकरण करणे, पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा करणे तसेच संगम माहुली येथील महाराणी ताराबाई, येसूबाई राणीसाहेब, छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळांचे संवर्धन, जीर्णोद्धार आणि संगम माहुलीचा संपूर्ण परिसर विकसित करणे या कामांना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. या कामाचा परिपूर्ण प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहे. त्यामुळे किल्ले अजिंक्यतारा आणि संगम माहुली परिसराचा लवकरच कायापालट होणार आहे.

Advertisement

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या (दृश्यप्रणालीद्वारे) अध्यक्षतेखाली व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला मंत्री निलेश राणेही उपस्थित होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, सांस्कृतिक विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव खारगे, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव गोविंद राज, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील (व्हीसी द्वारे) यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

बैठकीत संगम माहुली येथील महाराणी ताराबाई, येसूबाई राणीसाहेब यांच्या समाधीस्थळांचा जीर्णोद्धार, विकास करणे, तसेच अस्तित्वातील पहिले शाहू महाराज यांच्या समाधीचा विकास करणे, याठिकाणी माहिती फलक लावणे, परिसरात अस्तित्वात असणाऱ्या अन्य काही समाधींचे जतन आणि संवर्धन करणे, राज घराण्यातील व्यक्तींसाठीच्या अंत्यसंस्काराच्या जागेचा विकास, नदीकाठी घाटाचे विस्तारीकरण, दशक्रिया विधी जागा घाटावरून दक्षिण बाजूस स्थलांतरित करणे, पूर्वकालीन झुलत्या पादचारी पुलाचे नवनिर्माण करणे, काशी विश्वेश्वर, रामेश्वर आणि संगमेश्वर या मंदिरांचे जतन व संवर्धन करणे, नागरिकांसाठी स्वच्छतागृह बांधणे, भविष्यातील गर्दीचा विचार करता माहुलीच्या बाजूने नवीन रस्ता विकसित करून वाहनांसाठी वाहनतळ तसेच रामेश्वर मंदिराच्या परिसरात संग्रहालयाची निर्मिती करणे याबाबत सविस्तर चर्चा झाली. या कामासाठी काढण्यात आलेल्या ढोबळ अंदाजपत्रकानुसार 311 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

किल्ले अजिंक्यतारा येथे येणारे हजारो पर्यटक आणि मॉर्निग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. किल्ल्यावरील मुख्य प्रवेशद्वार आणि दक्षिण दरवाजा या दोन्हींचे जतन आणि संवर्धन करणे, अस्तित्वातील तटबंदी आणि बुरुज यांचे जतन संवर्धन करणे, अस्तित्वातील राजसदर, टांकसाळी यांचे संवर्धन पूर्वी होते त्या प्रकारे करून या इमारतींचा वापर म्युझियम म्हणून करणे, शालेय विध्यार्थ्यांना माहिती देण्याकरता लागणारा हॉल, मॉर्निग वॉक व फिरण्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी पायाभूत सुविधा, पार्किंगपासून दक्षिण दरवाजापर्यंतची पायवाट व किल्ल्यावरील पायवाटा परिपूर्ण करणे, किल्ल्यावरील अस्तित्वात असलेल्या पाणवठ्यांचे जतन व संवर्धन करून तेथील जैवविविधतेला कोणत्याही प्रकारे हानी पोहोचू नये या दृष्टिकोनातून निसर्ग अभ्यासकांना येथे येणारे पक्षी व प्राणी न्याहाळता यावेत याकरिता प्रमुख तीन पाणवठ्यांवर मनोरे उभारणे तसेच ते एकमेकांना तरंगत्या पुलाने जोडणे, सहलींद्वारे येणाऱ्या विद्यार्थ्यांना एकत्र बसून शिवकालीन ऐतिहासिक प्रसंग व किल्ल्याचे महत्व सांगण्यासाठी एक एमपी थिएटर विकसित करणे, पर्यटकांसाठी दोन ठिकाणी स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी तसेच कपडे बदलण्यासाठी खोल्या बांधणे, ठिकठिकाणी माहिती फलक बसवणे, रात्रीच्या वेळी पदपथांच्या बाजूने प्रकाशझोत टाकणे तसेच काही ठिकाणी विसावा स्थळे निर्माण करणे आदी विकासकामांबाबत चर्चा झाली. या कामासाठी 112.87 कोटी इतका अंदाजित खर्च अपेक्षित आहे.

बैठकीअंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीनुसार या दोन्ही महत्वाकांक्षी प्रकल्पांना मंजुरी दिली. या दोन्ही प्रकल्पांचे परिपूर्ण प्रस्ताव तातडीने राज्य शासनाकडे सादर करण्याच्या सूचना ना. पवार आणि ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. दरम्यान, बैठकीत राजकोट (मालवण) येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराच्या विकासासंदर्भातही सकारात्मक चर्चा झाली.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article