उत्तर प्रदेशचे माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य फरार घोषित
घटस्फोट न घेता दुसरे लग्न केल्याचा मुलीवर आरोप
वृत्तसंस्था /लखनौ
उत्तर प्रदेशातील माजी पॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य आणि त्यांची कन्या माजी खासदार संघमित्रा यांना न्यायालयाने फरार घोषित केले आहे. खासदार -आमदार न्यायालयाने वडील आणि मुलीला फरार घोषित केले आहे. घटस्फोट न घेता फसवून दुसरा विवाह केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेसंबंधीच्या खटल्यात ते सातत्याने सुनावणीसाठी हजर न राहिल्याने न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
स्वामी प्रसाद मौर्य आणि त्यांची कन्या माजी खासदार संघमित्रा हे तीन वेळा समन्स बजावून, दोनदा जामीनपात्र वॉरंट आणि एकदा अजामीनपात्र वॉरंट बजावूनही न्यायालयात हजर होत नसल्याचा आरोप आहे. दीपक कुमार स्वर्णकर यांनी संघमित्रा, स्वामी प्रसाद मौर्य आणि इतर पाच जणांविऊद्ध मारहाण, शिवीगाळ, जीवित व मालमत्तेला धोका आणि कट रचल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दीपक स्वर्णकर यांनी संघमित्रा मौर्यशी विवाह केला असून तो तिला अमान्य आहे. तसेच वडील म्हणजेच स्वामी प्रसाद मौर्य सातत्याने धमक्मया देतात. याप्रकरणी लखनौच्या खासदार-आमदार न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता.