For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माजी क्रीडामंत्री मोंत व्रुझ यांचे निधन

01:13 PM Aug 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
माजी क्रीडामंत्री मोंत व्रुझ यांचे निधन
Advertisement

नेहरू स्टेडियम 180 दिवसांत उभारण्याचे श्रेय : राजकीय, सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त

Advertisement

मडगाव : बाणावली मतदारसंघाचे माजी आमदार आणि माजी क्रीडामंत्री मोंत व्रुझ यांचे काल मंगळवारी पहाटे वयाच्या 79 वर्षी दु:खद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुऊवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. क्रीडामंत्री असताना मोंत व्रुझ यांनी विक्रमी 180 दिवसात फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमची उभारणी केली होती. त्यांच्या या कामाबद्दल ते तमाम गोवेकारांच्या स्मरणात कायम राहणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच इतर राजकीय नेत्यांनी मोंत व्रुझ यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल आणि क्रिकेटच्या नकाशावर गोव्याचे नाव कोरणारे गोव्याचे माजी क्रीडामंत्री अशी मोंत व्रुझ यांची ओळख होती. 1980 च्या दशकात फातोर्डा येथे प्रतिष्ठित नेहरू चषक आयोजित करण्यासाठी 180 दिवसांच्या आत विक्रमी वेळेत नेहरू स्टेडियम बांधून, गोव्यातील क्रीडा क्षेत्रातील सर्वात मौल्यवान योगदान दिले होते.

मोंत व्रुझ हे क्रीडामंत्री असताना त्यांनी सिलिगुडी येथे प्रवास केला आणि ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनला सांगितले की, गोव्यात नेहरू चषक ही लोकप्रिय आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आयोजित करायची आहे. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन त्यासाठी इच्छुक होते. पण, एक समस्या होती. गोव्यात अशी स्पर्धा आयोजित करण्यासाठी मोठे स्टेडियम नव्हते. त्यानंतर मोंत व्रुझ यांनी नवीन स्टेडियम बांधण्याचे मान्य केले आणि स्टेडियमचे काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या पाठिंब्याने, मोंत व्रुझ यांनी ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनला दिलेले वचन पूर्ण केले आणि स्टेडियमचे काम सहा महिन्यात पूर्ण केले. स्टेडियमचे बांधकाम सुरू असताना ते स्वत: कामावर देखरेख ठेवायचे सकाळी 8 वाजता ते स्टेडियममध्ये यायचे व रात्री उशिरा घरी जायचे.

Advertisement

मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

मोंत व्रुझ यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. व्रुझ यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दु:ख झाले. राज्यासाठी त्यांनी दिलेले योगदान नेहमीच लक्षात ठेवले जाईल, अशा शब्दात मुख्यमंत्री सावंत यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

अनेक ‘बेंचमार्क’ स्थापित केले

मोंत व्रुझ यांनी नेहमीच नवे ‘बेंचमार्क’ स्थापित केले. त्यांच्या निधनाने राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे राजकीय जीवन आणि उद्योगातील विक्रम उत्तुंग आहेत. आपण त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे, शब्दात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

भ्रष्टाचारापासून रहिले दूर

बाणावलीचे आमदार व्हेन्झी व्हियेगस यांनीही मोंत व्रुझ यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. फातोर्डा स्टेडियमचे विक्रमी वेळेत बांधकाम करण्यात त्यांचे योगदान खुप मोठे आहे. ते भ्रष्टाचारापासून दूर राहिले. त्यांना बाणावलीच्या जनतेबद्दल तळमळ होती. बाणवली मतदारसंघावर अन्याय होऊ नये, अशी त्यांची भावना होती असे व्हियेगस म्हणाले. वीजमंत्री सुदिन ढवळीकर, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, उपसभापती ज्योशुआ डिसोझा, माजी आमदार चर्चिल आलेमाव, माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो, फातोर्डाचे माजी आमदार दामू नाईक, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर तसेच इतरांनी मोंत व्रुझ यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले असून त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.

Advertisement
Tags :

.