माजी खेळाडू मिथुन मन्हास ‘बीसीसीआय’चे नवे अध्यक्ष
वृत्तसंस्था/ मुंबई
दिल्लीचे माजी कर्णधार मिथुन मन्हास यांची रविवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) अध्यक्षपदी निवड झाली. 45 वर्षीय मन्हास हे मंडळाचे 37 वे अध्यक्ष बनले आहेत. त्यांनी 70 वर्षांचे झाल्यानंतर गेल्या महिन्यात राजीनामा दिलेल्या रॉजर बिन्नी यांची जागा घेतली आहे.
1997-98 ते 2016-17 दरम्यान 157 प्रथम श्रेणी, 130 ‘अ’ श्रेणी आणि 55 आयपीएल सामन्यांमध्ये खेळलेला हा माजी अष्टपैलू खेळाडू या महिन्याच्या सुऊवातीला नवी दिल्लीत झालेल्या मंडळाच्या प्रभावशाली व्यक्तींच्या अनौपचारिक बैठकीनंतर अध्यक्षपदासाठी सर्वसंमत पर्याय म्हणून पुढे आला होता. मन्हास यांनी प्रथम श्रेणीत 9714 धावा काढलेल्या आहेत, ज्यामध्ये 27 शतके आहेत आणि ‘अ’ श्रेणी सामन्यांमध्ये 4126 धावा काढलेल्या आहेत.
वार्षिक सर्वसाधारण सभेने काही इतर महत्त्वाच्या नियुक्तींवर शिक्कामोर्तब केले आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया आणि आयपीएल कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष अऊण धुमल यांची पदे कायम राहिली आहेत, तर कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे प्रमुख आणि माजी भारतीय क्रिकेटपटू रघुराम भट यांची कोषाध्यक्षपदी निवड झाली आहे. रोहन गावस देसाई यांच्या जागी प्रभतेज भाटिया यांची कोषाध्यक्षपदावरून संयुक्त सचिवपदी निवड झाली आहे आणि सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयदेव शाह यांची दिलीप वेंगसरकर यांच्या जागी मंडळ सदस्य म्हणून निवड झाली आहे.
दरम्यान, नीतू डेव्हिड यांच्या जागी अमिता शर्मा यांची महिला निवड समितीच्या अध्यक्षा म्हणून निवड झाली असून 116 एकदिवसीय सामने खेळलेल्या या माजी भारतीय वेगवान गोलंदाजासोबत श्यामा डे, जया शर्मा आणि श्रवंती नायडू यांचा निवड समितीत समावेश करण्यात आला आहे. त्यांचा कार्यकाळ 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या महिला विश्वचषकानंतर सुरू होईल. भारताचे माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू आर. पी. सिंग आणि प्रग्यान ओझा यांचा पुऊष निवड समितीत समावेश करण्यात आला आहे, तर तमिळनाडूचे माजी फलंदाज एस. शरथ कनिष्ठ निवड समितीत परतले आहेत.