2009 च्या जुन्या जखमा अजून पुसलेल्या नाही! चर्चेसाठी सगळ्यांना दारं खुली
लोकसभा निवडणूकसाठी स्वराज्य पक्ष हा मुख्य प्रवाहात असणार असून जर लोकांची कोल्हापूरातून स्वराज्याला पाठींबा मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे असे माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी म्हटले असून 2009 ला लोकसभेच्या निवडणुकीमधील पराभवाची जखम अजूनही विसरलेलो नसल्याची भावनाही त्यांनी बोलून दाखवली. दोन जातींमध्ये तेढ निर्माण होऊ नये यासाठी लोकप्रतिनिधींनी जबाबदारपणे वक्तव्य करावीत असा टोलाही त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना लगावला आहे.
आज कोल्हापूरात माध्यमांशी बोलताना स्वराज्य संघटनेचे प्रमुख माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राजकिय परिस्थितीवर भाष्य करताना, "हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचे राज्य आहे. दोन जातीत तेढ निर्माण होऊ नये अशी नेहमी माझी भूमिका राहिली आहे. त्यामुळे राज्यातील जबाबदार लोकप्रतिनिधींनी जाहीर भाष्य करताना विचार करून बोलावे."असा टोला त्यांनी जितेंद्र आव्हाढ यांना संभाजीराजे यांनी लगावला.
पावनगडावरील अतिक्रमणावर बोलताना ज्या गोष्टी जुन्या आहेत त्याचे चांगल्या पद्धतीने संवर्धन आणि जतन होणे गरजेचं असतं. नवीन काहीतरी करून त्याला धार्मिक वळण देणं चुकीचं आहे. अतिक्रमणा संदर्भात शासनाने पॉलिसी आखली पाहिजे असं म्हटलं आहे.
आगामी लोकसभा निवडणूकांवर भाष्य करताना ते म्हणाले, "लोकसभा निवडणूकीमध्ये स्वराज्य पक्ष हा मुख्य प्रवाहात राहणार आहे. या अगोदर स्वराज्य पक्षाचे लक्ष विधानसभा निवडणुक होतं. मात्र आता लोकसभा लढवावी अशी अनेकांची इच्छा आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्वराज्य पक्ष हा मुख्य राजकिय प्रवाहात राहणार आहे." असा त्यांनी खुलासा केला.
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूरातून इच्छुक आहात काय यावर बोलताना ते म्हणाले, "2009 च्या जुन्या जखमा अजूनही पुसलेल्या नाहीयेत....त्या जखमा लक्षात ठेवल्या आहेत...कोल्हापुरातून स्वराज्य लोकसभा लढवणार असल्याची चर्चा होत असेल तर चांगली गोष्ट आहे....कोण किती जास्त प्रेम देईल ते पाहून स्वराज्य किती जागा लढवणार ते ठरवेल. तसेच स्वराज्य पक्षाबरोबर चर्चा करण्यासाठी सर्वं पक्षांसाठी दारं खुली आहेत." असेही त्यांनी जाहीर केले.