For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अमल महाडिक बिनविरोध

12:35 PM May 09, 2023 IST | Abhijeet Khandekar
श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अमल महाडिक बिनविरोध

कोल्हापूर प्रतिनिधी

Advertisement

येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी आमदार अमल महादेवराव महाडिक तर उपाध्यक्षपदी नारायण बाळकृष्ण चव्हाण यांची संचालकांच्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी पार पडल्या. यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते.

हेही पहा >>> गोकुळमधील गैरकारभाराची चौकशी होणार : खा.धनंजय महाडिक

Advertisement

नुकतीच झालेली कारखान्याची निवडणूक राज्यभर गाजली. सत्ताधाऱ्यांनी सर्व 21 जागा जिंकत एकतर्फी विजय मिळवला. गेली 27 वर्षे एकहाती सत्ता असणाऱ्या महाडिक गटास सभासदांनी निवडून देऊन पुन्हा एकदा छत्रपती राजर्षी शाहू सहकार आघाडीकडे कारखान्याची सत्ता दिली. मंगळवारी कारखाना स्थळावर अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडी पार पडल्या. अध्यक्षपदासाठी संचालक शिवाजी पाटील यांनी अमल महाडिक यांचे नाव सुचवले. त्यास संचालक दिलीप उलपे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी नारायण चव्हाण यांचे नाव संचालक तानाजी पाटील यांनी सुचवले व त्यास संचालक संतोष पाटील यांनी अनुमोदन दिले. नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी कारखाना स्थळावर मोठी गर्दी झाली होती. यावेळी भिमा कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक, राजाराम कारखान्याचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, सत्यजित कदम, कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस तसेच सर्व संचालक व कर्मचारी उपस्थित होते. निवडी जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत गुलाल उधळला. डॉल्बीच्या दणदणाटात ‘मैं हू डॉन‘ गाण्यावर एकच जल्लोष केला.

Advertisement

कारखान्याच्या प्रगतीसाठी काम करणार
सभासदांनी आमच्या संपूर्ण पॅनेलला निवडून देत विरोधकांच्या अपप्रचारास उत्तर दिले आहे. येत्या काळात सभासद शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून वचननाम्यातील कारखान्याचे विस्तारीकरण, सहवीज प्रकल्प पूर्ण करणार असून पाच वर्षात सभासदांना बरोबर घेऊन कारखान्याच्या प्रगतीसाठी काम करणार आहोत, असे अध्यक्ष अमल महाडिक यांनी सांगितले.

वचननाम्याची पूर्तता होईल
कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सभासदांची इच्छा होती, पण माजी पालकमंत्र्यांनी द्वेषातून निवडणूक लादली. पण सभासदांनी विकासात्मक बाबीला कौल देत सत्ताधारी गटाचे सर्व उमेदवार निवडून दिले. कारखान्याचे नूतन अध्यक्ष अमल महाडिक आघाडीच्या वचननाम्याची पूर्तता करतील, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.

Advertisement
Tags :
×

.