माजी मंत्री सतपाल सांगवान यांचा जजपला रामराम
कार्यकर्ते संमेलनाच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन
वृत्तसंस्था/ चरखी दादरी
हरियाणाचे माजी कॅबिनेटमंत्री आणि जजपचे माजी उपाध्यक्ष सतपाल सांगवान यांनी कार्यकर्ते संमेलनाच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन केले आहे. तसेच त्यांनी काँग्रेस किंवा भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. सांगवान यांनी या संमेलनादरम्यान जजपमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. आगामी विधानसभा निवडणूक मी किंवा माझ्या कुटुंबातील कुठलाही सदस्य लढविणार असून यासंबंधी निर्णय मतदारसंघातील जनतेसोबत सल्लामसलत केल्यावर घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेस किंवा भाजपमध्ये प्रवेश करणार असलो तरीही याकरता कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करणार आहे. जजप हा विश्वासघात करणारा पक्ष आहे. माझा पराभव घडवून आणण्यासाठी जजप नेत्यांनीच प्रयत्न केले होते. खासदार धर्मवीर सिंह आणि काँग्रेस आमदार किरण चौधरी यांच्यात साटंलोटं असल्याचा आरोप सांगवान यांनी केला आहे.