For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माजी मंत्री नागेंद्रच मुख्य सूत्रधार

06:41 AM Sep 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
माजी मंत्री नागेंद्रच मुख्य सूत्रधार
Advertisement

वाल्मिकी निगमच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून आरोपपत्र दाखल : पाच जणांच्या नावाचा उल्लेख

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्यात मोठा गाजावाजा करून सत्ताधारी काँग्रेस सरकारला कोंडीत पकडणाऱ्या महषी वाल्मिकी विकास निगमच्या कोट्यावधींच्या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार माजी मंत्री बी. नागेंद्रच आहेत, असे म्हणत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)   आरोपपत्र दाखल केले. या घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी बेंगळूर येथील लोकप्रतिनिधी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार नागेंद्र हे या घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचा उल्लेख केला आहे.

Advertisement

ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात माजी मंत्री नागेंद्र यांच्यासह पाच जणांचा या घोटाळ्यात आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. या घोटाळ्यात माजी मंत्री बी. नागेंद्र आणि हैदराबाद बँकेचे अध्यक्ष सत्यनारायण वर्मा यांच्यासह पाच जणांना आरोपी करण्यात आले आहे.

यापूर्वी याच प्रकरणाचा तपास करणाऱ्या राज्यातील विशेष पोलीस पथकाने न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात माजी मंत्री बी. नागेंद्र आणि निगमचे अध्यक्ष, आमदार बसनगौडा दद्दल यांच्या नावांचा उल्लेख केला नव्हता. मात्र, अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेल्या आरोपपत्रात माजी मंत्री बी. नागेंद्र यांना घोटाळ्याचा सूत्रधार म्हणून उल्लेख केला आहे.

हैदराबादमधील मध्यस्थ सत्यनारायण शर्मा यांचे नागेंद्र यांच्याशी जवळचे संबंध होते. नागेंद्र यांच्या म्हणण्यानुसार 187 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. यापैकी 21 कोटी रुपये लोकसभा निवडणुकीसाठी वापरण्यात आल्याचे ईडीने  आरोपपत्रात म्हटले आहे. निगमचे माजी व्यवस्थापकीय संचालक पद्मनाभ यांनी हे खाते तत्कालीन मंत्री असलेल्या नागेंद्र यांच्या सूचनेनुसार उघडल्याचा जबाब  दिला आहे. सांघिला हॉटेल येथे झालेल्या बैठकीत नागेंद्र येण्या-जाण्याची दृश्ये सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. हॉटेलमध्ये पंचनामा करताना अनेक पुरावे सापडल्याचा उल्लेख ईडीने आरोपपत्रात केला आहे.

नागेंद्र यांचे निकटवर्तीय साहाय्यक देवेंद्रप्पा, नेटगुंटे नागराज आणि नागेश्वर राव या बैठकीत सहभागी झाल्याची माहिती आहे. नागेंद्र यांच्या सूचनेनुसार या घोटाळ्यात सहभागी झाल्याचा जबाब आरोपींनी दिला आहे. तसेच मृत अधिकारी चंद्रशेखर यांच्या मृत्यूपत्रात मंत्री असा उल्लेख असल्याचे ईडीने आरोपपत्रात नमूद केले आहे. ईडीने टाकलेल्या छाप्यात सापडलेली अनेक कागदपत्रे आरोपपत्रासोबत सादर करण्यात आली आहेत.

काय आहे प्रकरण?

महषी वाल्मिकी विकास निगमच्या एमजी रोडवरील युनियन बँक इंडिया खात्यातून 18 खात्यांवर 94.73 कोटी ऊपये बेकायदेशीरपणे हस्तांतरण करण्यात आले होते. निगमचे लेखापाल असलेले चंद्रशेखर यांनी या बेकायदेशीर पैसे हस्तांतरणाबाबत आपल्यावर दबाव असल्याचे सांगत मृत्यूपत्र लिहून आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येनंतर निगममधील घोटाळा बाहेर आला होता. राज्य सरकारने एसआयटी स्थापन करून या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिले होते. पण ईडीनेही याचा तपास करत नागेंद्र यांच्या निवासस्थानासह कार्यालयावर आणि त्याच्या नातेवाईकांच्या घरांवर छापे टाकून बरीच माहिती गोळा केली होती. कोणत्या खात्यात पैसे हस्तांतरण झाले याचाही माग काढला. आता ईडीने या सर्वांचा हवाला देत न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे.

Advertisement
Tags :

.