माजी मंत्री एच. डी. रेवण्णांची कारागृहातून मुक्तता
सोमवारी मिळाला होता सशर्त जामीन
प्रतिनिधी/ बेंगळूर
पीडित महिलेच्या अपहरण प्रकरणी आरोप असलेल्या माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांची मंगळवारी कारागृहातून मुक्तता झाली आहे. सोमवारी त्यांना बेंगळूरमधील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. मंगळवारी त्यांची कारागृहातून मुक्तता झाल्यानंतर निजद कार्यकर्त्यांनी फटाके उडवून आनंद साजरा केला. तर रेवण्णा थेट माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या बेंगळूरमधील निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर मंदिरांना भेटी देऊन दर्शन घेतले.
बेंगळूरच्या परप्पन अग्रहार कारागृहातून बाहेर पडल्यानंतर एच. डी. रेवण्णा निजद कार्यकर्त्यांची भेट घेणे शक्य झाले नाही. कारण कारागृहाबाहेर रेवण्णांची वाट पाहणाऱ्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावाला बाजूला करत त्यांच्या कारला मोकळी वाट करून दिली. यावेळी रेवण्णांनी कारची काच खाली करून समर्थकांच्या दिशेने हात जोडून अभिवादन केले. यावेळी समर्थकांनी रेवण्णांच्या नावाचा जयघोष केला.
पीडित महिलेच्या अपहरण प्रकरणी 4 मे रोजी एच. डी. रेवण्णा यांना त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले होते. त्यांनी वकिलांमार्फत दाखल केलेल्या जामीन याचिकेवर सोमवारी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.
कारागृहातून मुक्तता झाल्यानंतर ‘टेंपल रन’
होळेनरसीपूरचे आमदार एच. डी. रेवण्णा यांनी जामिनावर मुक्तता झाल्यानंतर मंदिरांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर देवेगौडा यांच्या निवासस्थानी माता-पित्याचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर बेंगळूरच्या जे. पी. नगर येथील तिरुमल लक्ष्मी वेंकटेश्वर मंदिरात दर्शन घेतले. मंदिरातील विशेष पूजेत ते सहभागी झाले. तेथून म्हैसूरमधील चामुंडेश्वरी देवीचे दर्शन घेतले. बुधवारी सकाळी ते श्रुंगेरीला भेट देणार असल्याचे समजते.