मेघालयचे माजी मुख्यमंत्री डी. डी. लपांग यांचे निधन
वृत्तसंस्था/ शिलाँग
मेघालयचे माजी मुख्यमंत्री डी. डी. लपांग यांचे शनिवार, 13 सप्टेंबर रोजी वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. ते राज्यातील सर्वात जास्त काळ सेवा करणाऱ्या राजकारण्यांपैकी एक होते. त्यांनी 1992 ते 2008 दरम्यान चारवेळा मुख्यमंत्रिपद भूषवले. शिलाँगमधील एका रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे. मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के. संगमा यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
लपांग यांचा जन्म 10 एप्रिल 1934 रोजी झाला. अतिशय साध्या पार्श्वभूमीतून राज्यातील सर्वोच्च राजकीय पदावर पोहोचलेले नेते म्हणून लपांग यांचे नाव घेतले जाते. लपांग यांचा राजकीय प्रवास 1972 मध्ये सुरू झाला. ते नोंगपोह येथून सर्वप्रथम अपक्ष उमेदवार म्हणून पहिल्यांदा मेघालय विधानसभेवर निवडून आले. अनेक दशके त्यांनी विविध मंत्रालयांमध्ये काम केल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. ते त्यांच्या राजकीय हुशारी आणि मैत्रीपूर्ण स्वभावासाठी ओळखले जात होते. साधेपणा आणि नम्रतेने त्यांनी सर्व पक्षांमध्ये आणि लोकांमध्ये आदर मिळवला. राजकारणात येण्यापूर्वी, लपांग हे रस्ते कामगार म्हणून काम करत होते. नंतर ते शाळेचे उपनिरीक्षकही बनले. या अनुभवांमुळे ते सामान्य नागरिकांच्या अडचणींशी जोडले गेले. सक्रिय राजकारणातून निवृत्त झाल्यानंतरही ते मेघालयातील एक आदरणीय राजकारणी राहिले.