आयएसआयचे माजी प्रमुख हमीद संकटात
सैन्याने घेतले ताब्यात : कोर्ट मार्शल होणार
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानच्या सैन्याने आयएसआयचे माजी प्रमुख लेफ्टनंट जनरल (निवृत्त) फैज हमीद यांना ताब्यात घेतले आहे. सैन्याच्या चौकशीत हमीद हे टॉप सिटी प्रकरणातील भ्रष्टाचारात दोषी आढळले आहेत. तसेच त्यांच्या विरोधात आता कोर्ट मार्शलची प्रक्रिया सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लेफ्टनंट जनरल फैज हमीद (सेवानिवृत्त) यांच्याविरोधात टॉप सिटी प्रकरणी करण्यात आलेल्या तक्रारींची सत्यता पडताळण्यासाठी सैन्याने केलेल्या चौकशीत ते दोषी आढळले आहेत. याचमुळे हमीद यांच्या विरोधात पाकिस्तान सैन्य अधिनियमाच्या तरतुदींच्या अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.
इम्रान खान यांचे निकटवर्तीय
हमीद हे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे अत्यंत निकटवर्तीय होते. एप्रिल 2022 मध्ये इम्रान खान पंतप्रधान असताना हमीद यांचे नाव सैन्यप्रमुख पदाच्या शर्यतीत आघाडीवर होते, परंतु पाकिस्तानच्या राजकारणाशी दिशाच बदलून गेल्याने हमीद यांना झटका बसला होता. जनरल बाजवा आणि मग जनरल आसिम मुनीर यांच्या नाराजीमुळे फैज हमीद आता आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहणार आहेत.
अफगाणिस्तानातील घडामोडींमध्ये भूमिका
अफगाणिस्तानात पुन्हा तालिबानची राजवट येण्याकरता हमीद यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अफगाणिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष अशरफ गनी हे देश सोडताना त्यांच्यासोबत काबूलच्या एका हॉटेलात हमीद दिसून आले होते. हमीद हे जून 2019 ते नोव्हेंबर 2021 पर्यंत पाकिस्तानची कुख्यात हेरयंत्रणा आयएसआयचे प्रमुख होते. तर सैन्यातून निवृत्त होण्यापूर्वी जनरल हमीद हे पाकिस्तानच्या 31 व्या कोरचे कमांडर म्हणून तैनात होते.