घानवडच्या माजी उपसरपंचांचा गार्डी येथे भरदिवसा खून
विटा :
गार्डी (ता. खानापूर) येथे नेवरी रस्त्यावर घानवडच्या माजी उपसरपंचांचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेने तालुक्यात खळबळ माजली आहे. बापूराव देवाप्पा चव्हाण (वय 47) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गुरुवारी 5 डिसेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला, अशी माहीती पोलिसांनी दिली. या प्रकरणाची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत विटा पोलीस ठाण्यात सुरू होते.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहीती अशी, बापूराव चव्हाण यांचा पोल्ट्री आणि विटा येथे सराफ व्यवसाय आहे. त्यांचे मूळ गाव घानवड आहे. गार्डी गावच्या हद्दीत गार्डी-नेवरी रस्त्यापासून काही अंतरावर त्यांचे पोल्ट्री शेड आहे. गुऊवारी 5 डिसेंबर रोजी दुपारी अडीचच्या दरम्यान ते घानवड येथून बुलेटवरून आपल्या पोल्ट्री शेडकडे निघाले होते. गार्डी गावच्या बाहेर अर्ध्या किलोमीटर अंतरावर गेल्यावर बापूराव चव्हाण यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून हलेखोर तेथून पळून गेले आहेत. हा वार वर्मी बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अनोळखी लोकांनी त्यांचा खून केल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात आले. ग्रामस्थांना खूनाची माहीती मिळताच त्यांनी विटा पोलिसांना कळाविले. घटनास्थळी पोलिस दाखल झाले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, हलेखोरांचा शोध घेण्यासाठी तीन पोलिस पथके नियुक्त करण्यात आली आहेत. हलेखोरांची शोध मोहीम सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सांगितले. हलेखोरांचा शोध घेण्यासाठी सांगली येथील श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. मात्र श्वान मृतदेहानजीकच घुटमळले. घटनास्थळी सांगली अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी भेट देऊन पाहणी केली. सांगलीचे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस अधिकारी व पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत पोलिस पथक परिसरात हलेखोरांचा शोध घेत होते. मात्र खून कोणी आणि का केला असावा? याबाबत पोलिसांच्या हाती धागेदोरे मिळालेले नाहीत. खुनाचा कसून तपास सुरू आहे, असे पोलिस निरीक्षक फडतरे यांनी सांगितले.