For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur : माजी जिल्हा अध्यक्ष बळीरामकाका साठे आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार

05:39 PM Nov 27, 2025 IST | NEETA POTDAR
solapur   माजी जिल्हा अध्यक्ष बळीरामकाका साठे आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार
Advertisement

                            उपमुख्यमंत्री अजित पवार आज वडाळा गावात

Advertisement

उत्तर सोलापूर : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीरामकाका साठे यांचा तीन आठवड्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात निश्चित झालेला प्रवेश आज होणार असून खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार आज वडाळा येथे पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी येणार आहेत. यावेळी कार्यकर्ता संवाद मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले असल्याची माहिती खुद्द साठे यांनी दिली.

गेली साठ वर्षांपासून खासदार शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहून राजकीय सहा दशकांचा त्यांच्याकडून राजकीय प्रवास केलेले काका साठे यांना विश्वासात न घेता चार महिन्यांपूर्वी जिल्हाध्यक्षपद काढून घेतले. तेव्हापासून साठे अस्वस्थ होते. आता खा. शरद पवार यांच्या पक्षात राहणे नाही, असे जाहीर केल्यानंतर त्यांना भाजपत येण्यासाठी आमदार सुभाष देशमुख, शिवसेनेत (एकनाथ शिंदे) येण्यासाठी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी आग्रह धरला होता.

Advertisement

मात्र, बहुतांशी कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेलेले बरे, असा सल्ला दिला. अशातच तीन आठवड्यांपूर्वी या पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी वडाळा येथे येऊन काका साठे यांची भेट घेऊन अजितदादांच्या पक्षात येणे कसे योग्य राहील, यावर एक तास चर्चा केली आणि थेट अजितदादांशी बोलणे करून दिले.

त्यानंतर पंधरा दिवसांपूर्वी काका साठे हे पवार यांना नातू जयदीप साठे यांच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी मुंबईला गेले असता मी तुमच्या सोबत असल्याचे साठे यांनी सांगितले. मात्र, अधिकृत प्रवेश कधी,याकडे साऱ्या जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

अखेर पक्ष प्रवेशाचा मुहूर्त ठरला असून गुरुवारी सकाळी दहा वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार वडाळा येथे येणार आहेत. यावेळी वडाळा येथील विठ्ठल मंगल कार्यालयात काका साठे यांच्या समवेत त्यांचे चिरंजीव व वडाळा गावचे सरपंच जितेंद्र साठे, काका साठे यांचे नातू जयदीप साठे, उपसरपंच अनिल माळी, प्रल्हाद काशीद, मार्डीचे उपसरपंच श्रीकांत मार्तंडे, शशिकांत मार्तंडे, प्रशांत काशीद यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री पवार यांच्यासमवेत जिल्हाध्यक्ष उमेश पाटील उपस्थित राहणार आहेत.

Advertisement
Tags :

.