कारवार येथील माजी नगरसेवकाची भीषण हत्या
दोन अज्ञातांनी चाकूने भोसकले
कारवार : येथील माजी नगरसेवक आणि सिव्हिल ठेकेदार सतीश कोळंबकर (वय 62 रा. पद्मनाथनगर, कारवार) यांची दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी चाकू भोसकून भीषण हत्या केली आहे. ही भयानक घटना रविवारी सकाळी साडेसात वाजता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्कलजवळच्या महिला आणि बाल अभिवृद्धी खात्याच्या कार्यालयासमोर घडली. रविवारी येथे आठवड्याचा बाजार होता. अन्य तालुक्यातील आणि जिल्ह्यातील शेकडो विक्रेते आपल्या दुकानाची मांडणी करीत असताना मुख्य रस्त्यावर घडलेल्या या थरारक हत्येमुळे कारवार तालुका हादरून गेला आहे. कारवार तालुक्यातील अलीकडच्या काळातील ही भीषण हत्या मानली जात आहे. कारण 20 ते 25 वर्षांपूर्वी येथील दैवज्ञ भवनासमोर कारवार-जोयडाचे आमदार वसंत असनोटीकर यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.
त्यानंतर काही वर्षातच असनोटीकर यांच्या हत्याकांडातील प्रमुख संशयित आरोपी आणि उद्योजक दिलीप नाईक यांची येथील कुटिन्हो रोडवर डोक्यावर प्रहार करून हत्या करण्यात आली होती. कोळंबकर यांच्या हत्या प्रकरणाबद्दल माहिती देताना कारवार जिल्हा पोलीसप्रमुख एम. नारायण म्हणाले, माजी नगरसेवक कोळंबकर हे राऊडी शिटर होते. रियल इस्टेट व्यवसायात गुंतलेल्यांना व बिल्डरना धमकावल्या प्रकरणी त्यांच्यावर 8 ते 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांवरही फसवणुकीची प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. माजी नगरसेवक आणि व्यवसायाने सिव्हिल ठेकेदार असलेले कोळंबकर रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे फिरायला आले होते. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन युवकांनी कोळंबकर यांना बाजारपेठेत गाठले. त्यावेळी पैशांवरून कोळंबकर आणि त्या दोन अज्ञातांमध्ये बाचाबाची झाली.
कोळंबकर यांच्या हत्येनंतर कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या निर्माण होऊ नये यासाठी पोलीस बारीक परिस्थितीवर नजर ठेऊन आहेत. पैशाच्या देवाण-घेवाणमधून झालेली ही हत्या वैयक्तिक स्वरूपाची आहे, असे पुढे नारायण यांनी स्पष्ट केले. सकाळी-सकाळी कोळंबकर यांची हत्या झाल्याचे वृत पसरताच शेकडो नागरिकांनी जिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली. यामध्ये कोळंबकर यांच्या कुटुंबीयांचा, नातेवाईकांचा आणि मित्र परिवाराचा समावेश होता. कोळंबकर यांच्या पत्नीही माजी नगरसेविका आहेत. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना कोळंबकर यांची कन्या पौर्णिमा म्हणाली, माझ्या वडिलांची हत्या नितेश तांडेल आणि दर्शन यांनीच केली आहे. आपल्या वडिलांचे कुणाशीही वैर नव्हते. तरीसुद्धा कोणत्या कारणासाठी त्यांची हत्या करण्यात आली आहे हे समजायला मार्ग नाही. दरम्यान कोळंबकर यांच्या हत्येनंतर येथील परिस्थिती शांत असून सदाशिनगर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.