चिलीच्या माजी राष्ट्रपतींना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार
शिवशंकर मेनन यांच्या नेतृत्त्वातील ज्युरींकडून घोषणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चिलीच्या माजी राष्ट्रपती आणि जागतिक मानवाधिकार कार्यकर्त्या मिशेल बाचेलेट यांना 2024 चा ‘इंदिरा गांधी शांतता पुरस्कार’ जाहीर झाला आहे. भारताचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र सचिव शिवशंकर मेनन यांच्या अध्यक्षतेखालील आंतरराष्ट्रीय ज्युरीने शुक्रवारी ही घोषणा केली.
2024 चा शांतता, नि:शस्त्राrकरण आणि विकासासाठीचा इंदिरा गांधी पुरस्कार चिलीच्या माजी राष्ट्रपती आणि मानवी हक्कांसाठी आघाडीवर असलेल्या मिशेल बाचेलेट यांना प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मिशेल बाचेलेट जेरिया यांचा जन्म 29 सप्टेंबर 1951 रोजी झाला. त्यांचे वडील चिलीच्या हवाई दलात जनरल होते. तर आई पुरातत्वशास्त्रज्ञ होती. त्यांनी चिली प्रजासत्ताकच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केले. त्यांनी दोनदा (2006-10 आणि 2014-18) चिली प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली होती. त्यांच्या कार्यकाळात भारत आणि चिली यांच्यात मुक्त व्यापार करार झाल्यामुळे द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत झाले होते.
मिशेल बाचेलेट ह्या शांतता, असमानतेशी लढा आणि मानवी हक्कांसाठी आपल्या दृढ वचनबद्धतेसाठी जगभरात ओळखल्या जातात. आपल्या देदीप्यमान कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. यामध्ये ‘युएन’च्या महिला संस्थापक-संचालक, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्त आणि चिलीच्या पहिल्या महिला अध्यक्षा या पदांचा समावेश आहे. त्यांनी लैंगिक असमानता आणि उपेक्षित समुदायांच्या हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे.