आंध्र सरकारने योजनांमधून हटविले माजी मुख्यमंत्र्यांचे नाव
महान व्यक्तींना दिला सन्मान
वृत्तसंस्था/ अमरावती
आंध्रप्रदेश सरकारने अनेक शासकीय शैक्षणिक कल्याणकारी योजनांमधून माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचे नाव हटविले आहे. शासकीय योजनांमधून माजी मुख्यमंत्र्यांचे नाव हटवून महान व्यक्तिंची नावे योजनेला देण्यात आली आहेत. आंध्रचे मंत्री नारा लोकेश यांनी जगनमोहन रेरेड्डी यांनी शिक्षण क्षेत्राला उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला.
नव्या नामकरणानुसार ‘जगन्ना अम्मा वाडी’ योजनेचे नाव बदलून आता ‘तल्लिकी वंदनम’ करण्यात आले आहे. या योजनेच्या अंतर्गत मातांना स्वत:च्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. अशाच प्रकारे ‘जगन्ना विद्या कनुका’ योजनेचे नाव बदलून ‘सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यामित्र’ करण्यात आले आहे. या योजनेच्या अंतर्गत राज्य सरकार विद्यार्थ्यांना शाळेची बॅग, पुस्तके आणि शिक्षणाशी संबंधित अन्य सामग्री प्रदान करते.
अशाच प्रकारे राज्यातील खासगी शाळांना मध्यान्ह आहार उपलब्ध करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘जगन्ना गोरुमुड्डीTA योजनेचे नाव बदलून ‘डोक्का सीतम्मा मध्यान्ह बडी भोजनम’ करण्यात आले आहे. शाळा नुतनीकरण योजना ‘माना बडी नाडु नेडू’चे नाव बदलून ‘माना बडी मन भविष्यक्तू’ करण्यात आले आहे. विद्यार्थिनींसाठी ‘मोफत सॅनिटरी नॅपकिन वितरण कार्यक्रम ‘स्वेच्छा’चे नाव बदलुन ‘बालिका रक्षा’ करण्यात आले आहे. शासकीय शाळांमधील विद्यार्थी परीक्षेत अव्वल आल्यास आर्थिक पुरस्कार देणारी योजना ‘जगन्ना अनिमुत्यालु’चे नाव बदलून ‘अब्दुल कलाम प्रतिभा पुरस्कार’ केले गेले.
मागील वायएसआर काँग्रेसच्या सरकारने शिक्षण क्षेत्राचे मेठे नुकसान केले आहे. एन. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारकडून आता शिक्षण क्षेत्राला प्रगतिपथावर नेण्याचे काम केले जात आहे. शैक्षणिक संस्थांना राजकारणापासून मुक्त करणे आणि त्यांना शिक्षणाचे केंद्र ठरविणे आमचा संकल्प असल्याचे उद्गार राज्याचे माहिती-तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि मनुष्यबळ विकास मंत्री नारा लोकेश यांनी काढले आहेत.