शबरीमला सोने चोरीप्रकरणी माजी बोर्ड अध्यक्षांना अटक
विशेष तपास पथकाकडून आतापर्यंतची पाचवी अटक
वृत्तसंस्था/तिरुअनंतपुरम
केरळच्या पठाणमथिट्टा जिह्यातील शबरीमला मंदिरातून सोने गायब झाल्याच्या कथित प्रकरणात विशेष तपास पथकाने (एसआयटी) त्रावणकोर देवस्वम बोर्डाचे (टीडीबी) माजी अध्यक्ष ए. पद्मकुमार यांना अटक केली आहे. तपास अधिकाऱ्यांनी गुरुवारी या कारवाईविषयी माहिती दिली. एसआयटीने केरळ विधानसभेचे माजी आमदार पद्मकुमार यांची तिरुवनंतपुरम येथील गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशी केल्यानंतर काही तासांतच ही चौकशी करण्यात आली. पद्मकुमार हे सोने चोरीमागील सूत्रधार असल्याचा संशय आतापर्यंतच्या तपासातून उघड झाला आहे.
एसआयटीच्या निष्कर्षानुसार पद्मकुमार यांनी उन्नीकृष्णन पोटी यांच्याशी त्यांच्या घरी गुप्त चर्चा केल्याचे दिसून आले आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) ज्येष्ठ नेते पद्मकुमार यांना 2019 मध्ये टीडीबीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्याचदरम्यान द्वारपालकांच्या (पालक देवता) मूर्तींसाठी सोन्याचा मुलामा दिलेल्या तांब्याच्या प्लेट्स आणि श्रीकोविलच्या (गर्भगृह) दाराच्या चौकटी इलेक्ट्रोप्लेटिंगसाठी उन्नीकृष्णन पोटी यांना देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रकरणातील ही पाचवी अटक आहे. यापूर्वी, एसआयटीने मुख्य आरोपी उन्नीकृष्णन पोटी, माजी कार्यकारी अधिकारी सुधीश कुमार आणि माजी प्रशासकीय अधिकारी बी. मुरारी बाबू यांना अटक केली आहे.