भाजपचे माजी मंत्री आता काँग्रेसमध्ये
उमेदवारी न मिळाल्याने जयनारायण व्यास होते नाराज
गुजरातचे माजी मंत्री जयनारायण व्यास यांनी सोमवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अहमदाबाद येथील एका कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व प्रदान केले. भाजपचे वरिष्ठ नेते असलेल्या व्यास यांनी 4 नोव्हेंबर रोजी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर ते राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासोबत एका कार्यक्रमात दिसून आले होते. तेव्हापासूनच त्यांच्या काँग्रेसप्रवेशाची चर्चा सुरू झाली होती.
मोदी सरकारमध्ये गुजरातचे आरोग्यमंत्री राहिलेल्या व्यास यांना मागील निवडणुकीत उमेदवारी मिळाली नव्हती. परंतु यंदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवारी देईल अशी अपेक्षा त्यांना होती. पण भाजपने यावेळीही त्यांना उमेदवारी नाकारली आहे. याचमुळे पक्षावर ते नाराज झाले होते. रविवारी ते सिद्धपूर येथे काँग्रेस उमेदवार चंदनजी ठाकोर यांच्या समर्थनार्थ आयोजित प्रचारसभेत सामील झाले होते.
4 वेळा आमदार
जयनारायण व्यास हे दीर्घकाळापासून भाजपमध्ये कार्यरत होते. केशुभाई पटेल अन् नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना जयनारायण व्यास या दोघांच्याही सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. 2017 पूर्वी सलग चारवेळा ते सिद्धपूरचे आमदार राहिले आहेत. विजय रुपाणी हे मुख्यमंत्री झाल्यावर व्यास हे सत्तेच्या वर्तुळाबाहेर पडले होते.