सर्वात हलक्या घनपदार्थाची निर्मिती
संशोधकांनी एक नव्या सर्वात हलक्या घनपदार्थाची निर्मिती करण्यात यश मिळविले आहे. हा पदार्थ घन असला तरी त्याचे वजन एका फुलाच्या कळीपेक्षाही कमी असते. त्याची घनता आतापर्यंत निसर्गात सापडलेल्या किंवा प्रयोगशाळांमध्ये निर्माण करण्यात आलेल्या कोणत्याही पदार्थांपेक्षा कमी आहे. पण त्याचा चिवटपणा मात्र, त्या तुलनेत अधिक आहे. हा पदार्थ एअरोजेल म्हणून ओळखला जात आहे.
हा पदार्थ विविध प्रकारच्या रासायनिक पदार्थांच्यापासून निर्माण करण्यात आला आहे. असा पदार्थ प्रथम 1931 मध्ये बनविण्यात यश आले होते. तथापि, आता त्याच्यात मोठी सुधारणा करुन तो अधिक हलका पण अधिक बळकट करणे शक्य झाले आहे. अॅल्युमिना, क्रोमियम आणि टिन ऑक्साईड हे या पदार्थाचे तीन प्रमुख निर्मितीघटक आहेत. 1980 मध्ये कार्बनचा उपयोग करुन असा हलका पदार्थ निर्माण करण्यात आला होता. या पदार्थात 50 टक्के ते 99.98 टक्के ऑक्सिजन समावू शकतो. त्यामुळे भविष्यकाळात तो ऑक्सिजनचा साठा करण्यासाठी सर्वात उपयुक्त स्रोत म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे. हा उष्णतेचा सर्वोत्तम प्रतिरोधक म्हणून काम करु शकतो. तो उष्णतेचे संक्रमण पूर्णपणे थांबवू शकतो. त्यामुळे अंतराळात जाण्यासाठी जी साधने लागतात त्यांची निर्मिती करण्यासाठी तो अतिशय आदर्श असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्यावर मोठा दाब पडला तरी आपल्या आकारात परिवर्तन न करता तो सहन करण्याची याची क्षमता आहे.