दर्पणी पाहता रूप....2
लहानपणी अनेक जादूच्या गोष्टी वाचत असताना जादूगाराबरोबर चेटकिणींचा पण आम्हाला परिचय होतो. या चेटकिणीजवळ नेहमी एक जादूचा आरसा असायचा. तिला हवं ते सगळं त्यात दिसायचं. नंतर थोडं मोठं झाल्यानंतर आजीकडून गोष्टी ऐकायला लागलो. महाभारतातला ध्रुतराष्ट्र भेटला. त्याला अंतर्चक्षु आणि बाह्यचक्षु या दोन्ही नजरा नाही हे समजले. अशा व्यक्तीला आरशाचा काही उपयोग नाही हे कळले. पण आम्ही मात्र स्वत:च्या दृष्टीबद्दल विचार करायला लागलो. आपल्या दृष्टीदोषाकडे डोळसपणे बघायला लागलो......आपल्यातही पुत्र प्रेमाने आंधळे झालेले लाखो लोक भेटतातच. अनेकांना डोळे असूनसुद्धा ‘डोळे झाक करणारे, सोडून देणारे किंवा दुसऱ्याचे डोळ्यावर घेणारे असे अनेक लोक आम्हाला भेटतात. अशा लोकांना नेमकं काय म्हणावं तेच लक्षात येत नाही. त्यानंतर लहानपणी आलेला अनारकली हा सिनेमा, अनेक प्रतिमांमध्ये दिसणारी, नाचणारी मधुबाला आम्हाला आरशाचं खूप छान महत्त्व सांगून जाते. राजस्थानचा शीश महाल आजही मनाला भुरळ घालतोच. महाराणी पद्मिनीचे सौंदर्य या आरशामुळेच शत्रूसमोर आलं आणि मग लक्षात आलं ‘प्रत्यक्षाहून प्रतीमा उत्कट’ दाखवणारा हा आरसा काही वेगळाच असला पाहिजे. असे जादूचे आरसे हल्ली काही कुठे मिळत नाहीत. पण ते बहुतेक प्रत्येक घरातल्या आईकडे असावेत असं वाटतं. कारण मुलं किंवा वडील बाहेर काय गुण उधळून आलेत किंवा हॉटेलमधलं खाऊन आलेत हे तिला आपोआप कळतं. दुसऱ्या दिवशी धुण्यात सिनेमाची तिकीटं सापडली की घरामध्ये मोठा तहलका माजायचा आणि मग आम्ही सगळे तिच्या या जादूच्या आरशापुढे अगदी साष्टांग दंडवत घालायचो. अनेकदा आपण वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्याने जातांना लांबून येणाऱ्या गाड्यांना वळणावरचे आरसे सावध करत असतात. त्याच्यामुळे अपघात टळतात हे आरसे पाहिल्यानंतर असे आरसे आपल्याही आयुष्यात आपल्याला मिळाले असते तर? किती तरी दुर्घटना टळल्या असत्या. पण आता असे आरसे माणसाच्या जीवनात राहिले नाहीत. आमच्याकडे येणाऱ्या माणसांचे मुखवट्यामागचे चेहरे दाखवणारे आरसे खरंतर आम्हाला मिळायला हवेत. ते मिळाले की जगामध्ये विश्वास नावाची गोष्ट चांगल्या पद्धतीने वाढेल. सपाट आरसा, अंतर्गोल आरसा, बहिर्गोल आरसा असे आरशांचे कितीतरी प्रकार भौतिक शास्त्रामध्ये शाळेत असताना आम्ही शिकत होतो. त्याच्यावरती सोडलेले प्रकाश किरण तिरकी जातात किंवा सरळ जातात याचा नीट अभ्यास करून आम्हाला नेमकी कशी दृष्टी हवी हे शिकायला मिळत असे. खरं म्हणजे आमच्या अवतीभोवती असणारे संत महात्मे मात्र अंतरात्म्याकडे वळण्यासाठी या आरशांचा उपयोग करतात. आपल्यातच ईश्वर पाहायला शिकवतात अंतर्मुख होणं म्हणजे आनंदाचे डोह निर्माण करणं शिकवतात. आमच्या बहिर्चक्षुंना मोराचे डोळे म्हणतात. आम्ही एआयच्या माध्यमातून जगात साम्राज्य जरी मिळवलं असलं तरी आत्म्याचं साम्राज्य मिळवायला दृष्टी, नजर यायला लागते. ते देण्याचं काम किंवा सत्संग मिळवण्याचं काम या आरशांच्या निमित्ताने सर्वत्र चालू असतं. कारण या संतांच्या जवळ आरपार सगळं दिसणारे आरसे असतातच. जे या मायावी जगाला कधीच दिसत नाही.