For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Breking: ज्यादा परताव्याच्या आमिषाने सॉफ्टवेअर इंजिनियरला सव्वा कोटीचा गंडा; सहा जणांवर गुन्हा दाखल; चौघांना अटक दोघे फरारी

09:23 PM Jun 29, 2024 IST | Abhijeet Khandekar
kolhapur breking  ज्यादा परताव्याच्या आमिषाने सॉफ्टवेअर इंजिनियरला सव्वा कोटीचा गंडा  सहा जणांवर गुन्हा दाखल  चौघांना अटक दोघे फरारी
Advertisement

उचगाव/वार्ताहर

Advertisement

शेअर मार्केटमध्ये अमाप पैसे कमावल्याची बतावणी करून ज्यादा परताव्याचे आमिष दाखवत सॉफ्टवेअर इंजिनियरला सव्वा कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्यां सहा जणांविरोधात गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद रवींद्र यशवंत कामत (रा .लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) यांनी दिली.

सुभाष शिवाजी कांबळे, (रा. वाकरे, ता. करवीर) सयाजी जिन्नाप्पा भोसले, रोहन जिन्नाप्पा भोसले, शिवाजी जिंन्नाप्पा भोसले (तिघेही रा.वळिवडे, ता. करवीर) अशा चौघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.

Advertisement

यापैकी मुख्य संशयित आकाश शिवाजी कांबळे, शिवाजी पांडुरंग कांबळे फरार झाले आहेत.

याबाबत गांधीनगर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फॉरेक्स शेअर मार्केट ट्रेडिंग करत असल्याचे सांगत उचगाव (ता. करवीर) येथील ब्राईट बूल ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट प्रा.लि. कंपनीमध्ये काही जणांना बोलावून शेअर मार्केटचे ट्रेनिंग दिले. शेअर मार्केटच्या माध्यमातून या सहा जणांनी भरपूर पैसे कमावल्याचे ट्रेनिंग साठी आलेल्या लोकांना सांगितले.ही बतावणी करताना महागड्या गाड्या,ब्रँडेड कपडे,परदेशात जाणे येणे,असा दिखावा करून ट्रेनिंगला आलेल्या लोकांना समोहित करून फसवले असल्याचे फिर्यादीने सांगितले. संशयित आरोपींनी फिर्यादी रवींद्र यशवंत कामत यांना पाच ते सहा टक्के प्रति महिना परतावा देऊ असे आश्वासन दिले. रवींद्र कामत, त्यांची पत्नी आणि इतर तीन जणांना या कंपनीमध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. 

कामत आणि त्यांच्या पत्नीसह अन्य तिघाजणांकडून एक कोटी बारा लाख सत्त्यान्नव हजार रुपयांची रक्कम गुंतवणुकीसाठी घेतली. जून २०२२ ते जून २०२४ पर्यंत फिर्यादीस आणि अन्य गुंतवणूकदारांना कोणताही परतावा अगर गुंतवलेली रक्कम या कंपनीकडून मिळाली नाही. याबाबत संशयीत आरोपींना वारंवार विचारणा केली असता त्यांनी कोणताही प्रतिसाद न देता वेळ काढूपणा केल्याने आपली फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या निदर्शनास आले. त्यामुळे कामत यांनी फसवणूक झाल्याची फिर्याद गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली. यावरून संबंधित सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. चौघा संशयित आरोपींना शनिवारी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजुर्के करत आहेत.

Advertisement
Tags :

.