तेंडोली-आराववाडीत लोक सहभागातून बांधला वनराई बंधारा
कृषी विभाग व तेंडोली ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने 'कच्चे व वनराई बंधारे मोहीम'
वार्ताहर/ कुडाळ
तेंडोली-आराववाडी येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग व ग्रामपंचायत तेंडोलीच्या संयुक्त विद्यमाने लोक सहभागातून 'कच्चे व वनराई बंधारे मोहीम' थेंब-थेंब वाचवा पाण्याचा, हाच मार्ग आहे, आपल्या समृद्ध भविष्याचा' या संकल्पने अंतर्गत वनराई बंधारा बांधण्यात आला. शेतकरी कर्मचारी व ग्रामस्थांच्या सहकार्याने व कृषी विभागाने एका दिवसात वनराई बंधारा बांधला. उन्हाळ्याच्या दिवसात शेतकऱ्यांना जनावरांसाठी व शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची कमतरता भासते. ही गैरसोय टाळण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या वनराई बंधाऱ्यामुळे पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. या मोहिमेत शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
या बंधाऱ्याच्या जागा बांधणीसाठी जागा पाहणी, पिशव्या, मनुष्यबळ आदी पूर्वतयारी कृषी विभाग व ग्रापंचायतीच्या माध्यमातून कृषी सहाय्यक रश्मी कुडाळकर यांनी केली. तेंडोली ग्रामविकास अधिकारी ए. एम. परब यांच्या प्रयत्नातून ग्रामपंचायती मार्फत पिशव्या उपलब्ध करून देण्यात आल्या.यावेळी सरपंच अनघा तेंडोलकर,उपसरपंच संदेश प्रभू, तालुका कृषी अधिकारी कुडाळ प्रवीण कोळी, विजय घोंगे, गायत्री तेली, मंडळ कृषी अधिकारी श्रीमती कवीटकर,कृषी सहाय्यक गोवेरी श्रीमती आजगावकर, शशिकांत आरोलकर, कर्मचारी वर्ग व कुंभारवाडीतील शेतकरी उपस्थित होते