For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भीमगड अभयारण्यातील गावांना वनमंत्र्यांची भेट

11:11 AM Dec 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
भीमगड अभयारण्यातील गावांना वनमंत्र्यांची भेट
Advertisement

ग्रामस्थांच्या स्थलांतरासाठी प्रयत्न : गावांमध्ये बैठक घेऊन ग्रामस्थांशी केली चर्चा : स्थलांतरितांना शासनाकडून प्रती कुटुंब 15 लाख रुपये देण्याची ग्वाही

Advertisement

खानापूर : वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी आमदार विठ्ठल हलगेकर आणि वरिष्ठ वन अधिकाऱ्यांसह सोमवारी रात्री उशिरा भीमगड अभयारण्य क्षेत्रातील तळेवाडीसह इतर गावांना भेट दिली.येथील तळेवाडी ग्रामस्थांशी स्थलांतर करण्याबाबत चर्चा केली. भीमगड अभयारण्यातून स्थलांतर व्हावे, असे आवाहन केले. तसेच सरकारकडून प्रती कुटुंब 15 लाख रुपये देण्यात येतील, याचा योग्य विनियोग करून ग्रामस्थांनी आपले जीवन मुख्य प्रवाहात येऊन जगावे, असे आवाहन यावेळी वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी ग्रामस्थांच्या बैठकीत केले. ही भेट अचानक रात्री उशीरा केल्याने तसेच दौऱ्याबद्दल गुप्तता बाळगून भेट दिल्याने भीमगड अभयारण्य क्षेत्रातील ग्रामस्थांतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. बैठकीनंतर हेम्माडगा येथील वन कॅम्पात मंत्री खंड्रे यांनी अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन काही सूचनाही केल्या.

तालुक्यातील पश्चिम भागातील दुर्गम वनक्षेत्र असलेल्या जंगल प्रदेशाला भीमगड अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. या भीमगड अभयारण्य क्षेत्रात गवाळी, केंगळा, पास्टोली, अबनाळी, जामगाव, हेम्माडगा, तळेवाडी, देगाव, पाली, मेंडील, कृष्णापूर, व्हळदा, आमगाव यासह अन्य गावे येतात. या गावांना कोणत्याही मुलभूत सुविधा पुरवण्यात येत नसल्याने ग्रामस्थांना हालाखीचे जीवन जगावे लागत आहे. सरकारने मुलभूत सुविधा पुरवण्याऐवजी तुटपुंजी नुकसानभरपाई देवून ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बेळगाव येथे अधिवेशनासाठी आलेले वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी सोमवारी सायंकाळी उशिरा भीमगड अभयारण्य क्षेत्रातील गावांना भेटी देवून तेथील आढावा घेतला. तसेच स्थलांतरासाठी काय नियोजन करता येईल, याबाबतही ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच ग्रामस्थांशी चर्चा करताना सरकारकडून प्रती कुटुंब 15 लाख रुपये देण्याचे नियोजन असल्याचे सांगून ग्रामस्थांनी स्वेच्छेने या दुर्गम भागातून स्थलांतर होऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन आपले आनंदी जीवन जगावे, आणि शासनाच्या सर्व सुखसुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांच्या बैठकीत केले.

Advertisement

13 गावे 3059 लोकसंख्या

भीमगड अभयारण्य क्षेत्रात एकूण 13 गावे आहेत. या गावात 754 कुटुंबे रहात आहेत. यात कोंगळा 63, पास्टोली 36, गवाळी 90, अबनाळी 81, जामगाव 82, हेम्माडगा येथे 128, तळेवाडी येथे 13, देगावमध्ये 31, पाली येथे 73, मेंडील 40, कृष्णापूर 12, व्हळदा येथे 7 कुटुंबे आहेत. आणि आमगावमध्ये 98 कुटुंबे राहतात. यात 1530 पुरुष आणि 1443 महिलांसह एकूण 3059 लोकसंख्या आहे. ग्रामस्थांनी स्वेच्छेने स्थलांतरास संमती दिल्यास सरकारकडून प्रती कुटुंब 15 लाख रु. देवून स्थलांतरासाठी प्रयोजन करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

तरीही ग्रामस्थांमधून नाराजी

वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी अचानकपणे भीमगड अभयारण्य क्षेत्रात भेट देवून ग्रामस्थांशी स्थलांतराबाबत चर्चा केली. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर सोबत असल्याने ग्रामस्थांतून याबाबत आश्चर्य आणि नाराजी व्यक्त होत आहे. मुलभूत सुविधा पुरवण्याऐवजी स्थलांतरासाठी प्रयत्न करत असल्याने आमदारांच्या भूमिकेबद्दल ग्रामस्थांतून नाराजीचा सूर उमटत आहे. या स्थलांतराच्या नियोजनाबाबत यापूर्वीही ग्रामस्थांनी बैठक घेऊन विरोध जाहीर केला आहे. असे असताना आमदार विठ्ठल हलगेकर यांनी पुढाकार घेऊन वनमंत्र्यांचा गुप्त दौरा का आयोजित केला, असा सवाल विजय मादार यांनी व्यक्त केला आहे. सोमवारी रात्री उशीरा वनमंत्र्यांनी हेम्माडगा येथील कॅम्पात वन अधिकाऱ्यासंमवेत बैठक केली. या बैठकीत मुख्य वनसंरक्षक ब्रिजेशकुमार दीक्षित, उपमुख्य वनसंरक्षक कुमार पुष्कर, बेळगावचे मुख्य वनसंरक्षक मंजुनाथ चव्हाण, उप वनसंरक्षक मारिया क्रिस्तू राज, सहायक वनसंरक्षक सुनीता निंबरगी यासह भीमगड अभयारण्य आणि खानापूर, लोंढा वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

म्हादई नदीचीही पाहणी

वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी सोमवारी सायंकाळी 5 वाजता भीमगड अभयारण्य क्षेत्रातील म्हादई नदीच्या पात्राची पाहणी केली. तसेच या अभयारण्य क्षेत्रातील महिला उपजीविकेसाठी काम करून घरी परतत असताना त्यांच्याशी समस्येबाबत चर्चा केली. यावेळी महिलांनी जंगली जनावरांच्या हल्ल्यांच्याबाबत तसेच जंगली प्राण्यांच्या धुमाकुळामुळे शेती करणे अवघड झाल्याचे सांगितले. तसेच आम्हाला मुलभूत सुविधा पुरवण्यात याव्यात, अशी मागणी यावेळी महिलांनी केली.

Advertisement
Tags :

.