टस्कर हत्तीला पकडण्यात वनखात्याला यश
जळगे परिसरात वास्तव्यास : हत्तीला पकडण्यासाठी चिफ वाईल्ड लाईफ वॉर्डनची परवानगी
विवेक गिरी/खानापूर
जळगा, करंबळ, चापगाव परिसरात गेल्या पाच-सहा महिन्यांपासून ठाण मांडून राहिलेल्या टस्कर हत्तीला पकडून शिमोगा सक्रेबैल येथे हलविण्यात वन विभागाला यश आले आहे. हत्तीला पकडण्यासाठी शिमोगा सक्रेबैल येथील हत्ती प्रशिक्षण शिबिरातील चार हत्ती आणि वीस कर्मचारी, तसेच बेळगाव, खानापूर, लोंढा, कणकुंबीसह इतर वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि जवळपास शंभर कर्मचारी, पोलीस, वैद्यकीय पथक हत्ती पकडण्याच्या मोहिमेत सहभागी झाले होते. सीसीएफ मंजुनाथ चव्हाण, खानापूर वनविभागाच्या सुनीता निंबरगी, खानापूर विभागाचे आरएफओ श्रीकांत पाटील, लोंढा विभागाचे वाय. पी. तेज यांसह बेळगाव आणि इतर विभागातील वन अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. अवघ्या सहा तासांत हत्तीला जेरबंद करण्यात यश आले आहे. हत्तीला पकडण्याची मोहीम यशस्वी झाल्याबद्दल वनविभागाचे मारीया क्रीस्तू राजू यांनी समाधान व्यक्त केले आहे.
जळगा, कारलगा, करंबळ, चापगाव परिसरात टस्कर हत्तीने गेल्या पाच-सहा महिन्यांपासून तळ ठोकला होता. हा हत्ती ऊस आणि भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत होता. ऐन सुगीच्या वेळेतही हा हत्ती जळगा परिसरातच होता. त्यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी वनखात्याकडे वेळोवेळी मागणी करण्यात येत होती. मानव वस्तीजवळ हत्ती वावरत असल्याने वनखात्यालाही हत्तीचा बंदोबस्त करणे अनिवार्य झाले होते. गेल्या पाच-सहा महिन्यांत हत्तीला वनखात्याने तीन-चारवेळा जंगलात पिटाळले होते. मात्र हा हत्ती जंगलात न राहता पुन्हा मानव वस्तीजवळच येत होता. त्यामुळे या हत्तीचा बंदोबस्त करणे गरजेचे होते. याबाबत आमदार विठ्ठल हलगेकर यांनीही गेल्या चार महिन्यांपूर्वी वनविभागाच्या मुख्य सचिव मंजुनाथ प्रसाद यांची भेट घेऊन हत्तीला पकडून अन्यत्र हलविण्याची मागणी केली होती
हत्तीला पकडण्यास परवानगी
हत्तीला पकडून अन्यत्र हलविण्यासाठी वनविभागाच्या चिफ वाईल्ड लाईफ वॉर्डन बेंगळूर यांची परवानगी आवश्यक होती. यासाठी खानापूर वनविभागाच्या अधिकारी सुनीता निंबरगी यांनी बेळगाव विभागाचे डीसीएफ मारीया क्रिस्तू राजू यांना पत्र लिहिले होते. याची दखल घेऊन मारीया क्रिस्तू राजू यांनी बेंगळूर येथील चिफ वाईल्ड लाईफ वॉर्डन यांना पत्र लिहून हत्तीला पकडण्याची परवानगी मागितली होती. याबाबत गेल्या नोव्हेंबरपासून पत्रव्यवहार सुरू होता. गेल्या आठ दिवसांपूर्वी हत्तीला पकडून शिमोगा येथील शिबिरात हलविण्याची परवानगी मिळाली होती. त्यानुसार शिमोगा सक्रेबैल येथील शिबिराच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हत्तीला पकडण्याची मोहीम आखण्यात आली. त्यानुसार सक्रेबैल शिबिरातील प्रशिक्षित चार हत्ती, वन कर्मचारी, वैद्यकीय पथक, तसेच इतर कर्मचाऱ्यांचा या पथकात समावेश होता. हे पथक बुधवारी रात्री दाखल झाले. या मोहिमेबाबत अत्यंत गुप्तता बाळगण्यात आली होती. पहाटे 6 वाजता जळगे येथील चंदन प्लॅन्टेशनजवळ मोहिमेला सुरुवात करण्यात आली. हत्तीला बेशुद्ध करून पकडण्याचे नियोजन करण्यात आले.
यासाठी चार हत्ती, एक क्रेन, दोन जेसीबी आणि ट्रक यासह इतर वाहनांचाही वापर करण्यात आला. सकाळी 10 वाजता हत्ती जळग्याजवळील पूर्व भागातील जंगलात असल्याचे समजले. यानंतर ड्रोनचा वापर करून हत्तीचा मागोवा घेण्यात आला. हत्ती दृष्टीस पडताच शिमोगा येथील डॉ. रमेश यांनी बंदुकीतून हत्तीला डायजोझीन हे इंजेक्शन दिले. त्यानंतर हत्ती जळग्याच्या रवळनाथ मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या उसाच्या फडात गेला. त्याच्या मागून प्रशिक्षित हत्ती आणि वन कर्मचारी हत्तीचा पाठलाग करत गेले. एका ठिकाणी हत्तीला गाठण्यात यश आले. गुंगीचे इंजेक्शन दिल्यामुळे टस्कर हत्तीला गुंगी चढली होती. यानंतर टस्कर हत्तीला चार हत्तींनी घेरण्यात आले. दोरखंडांनी जेरबंद करण्यात आले. चारही पाय आणि डोक्याला बांधण्यात आले. त्यानंतर पुन्हा रिटाव्हर हे इंजेक्शन देऊन हत्तीला पूर्ण शुद्धीत आणण्यात आले. त्या हत्तीला उसातून बाहेर आणून एका मैदानात आणण्यात आले. प्रशिक्षित हत्तींच्या साहाय्याने टस्कर हत्तीला पट्टे बांधून क्रेनद्वारे उचलून ट्रकमध्ये घालण्यात आले. यानंतर ट्रक मुख्य रस्त्यावर आणण्यात आला. हत्तीला दोरखंडातून मोकळे करून साखळीने पुन्हा जेरबंद करण्यात आले. यानंतर शिमोगा येथून आलेले शिबिरातील पथक आपल्या चार हत्तींसह टस्कर हत्तीला घेऊन सक्रेबैलकडे रवाना झाले. त्यामुळे वनविभागाने सुटकेचा श्वास सोडला.
बघ्यांची एकच गर्दी
जळगा परिसरात बघ्यांची एकच गर्दी झाली होती. पोलिसांना गर्दी पांगवण्यासाठी वेळोवेळी हस्तक्षेप करावा लागत होता. मात्र हत्तीला पाहण्यासाठी आलेले लोक या ठिकाणाहून हटत नव्हते. प्रत्येकजण व्हिडिओ, फोटो घेण्यात गुंग होता. प्रशिक्षित हत्तींची कामगिरी पाहून लोकातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.
टस्कर हत्तीने सहकार्याची भूमिका घेतल्याने मोहीम यशस्वी
याबाबत वनखात्याचे डीसीएफ मारीया क्रिस्तू राजू ‘तरुण भारत’शी बोलताना म्हणाले, अवघ्या सहा-सात तासांत मोहीम यशस्वी होण्याची पहिलीच वेळ आहे. टस्कर हत्तीनेही त्रास दिलेला नाही. अन्यथा जंगली हत्ती इतक्या सहजतेने सहकार्य करत नाहीत. मात्र या हत्तीने अगदी सहकार्याची भूमिका घेतल्याने मोहीम यशस्वी होण्यास वेळ लागला नाही. हा हत्ती आता सक्रेबैल येथील हत्तींच्या शिबिरात दाखल करण्यात येणार असून या हत्तीला पुढील दोन महिन्यांत प्रशिक्षित केले जाणार आहे, असे ते म्हणाले.