एका दिवसात 2 लाखांचा महसूल तिजोरीत
व्यापार परवाना-नूतनीकरणासाठी मनपामध्ये व्यावसायिकांची गर्दी
बेळगाव : व्यापार परवान्यासाठी महापालिका अधिकारी आक्रमक बनल्याने विनापरवाना व्यवसाय करणारे व्यावसायिक धास्तावले आहेत. त्यामुळे नवीन व्यवसाय परवाना घेण्यासह परवान्यांचे नूतनीकरण करून घेण्यासाठी व्यावसायिकांची महापालिकेत मोठी गर्दी होऊ लागली आहे. गुरुवार दि. 9 रोजी व्यापार परवान्यांच्या माध्यमातून एका दिवसात तब्बल 2 लाख रुपयांचा महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. शहर आणि उपनगरात मोठ्या प्रमाणात विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या वाढली आहे. व्यापार परवान्याच्या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत महसूल जमा होतो. पण परवाना घेण्यासह त्याचे नूतनीकरण करण्याकडे बहुतांश जणांनी पाठ फिरविल्याने महापालिकेचा महसूल बुडत आहे. महापालिकेच्या व्याप्तीत येणाऱ्या सर्व व्यावसायिकांनी मनपाचा व्यापार परवाना घेणे बंधनकारक आहे. पण अनेक जणांनी मनपाचा व्यापार परवाना घेण्याऐवजी उद्यम परवाना घेतला आहे. ज्याठिकाणी एखादी वस्तू तयार केली जाते, तसेच त्याठिकाणी 20 हून अधिक कामगार काम करतात केवळ त्याठिकाणीच उद्यम परवाना लागू पडतो. पण लहानसहान दुकान चालकांनीही उद्यम परवाना घेतला आहे.
ही बाब मनपा आयुक्तांच्या निदर्शनास आल्याने त्या संतापल्या आहेत. अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना अधिकारीच पाठीशी घालत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे मनपा आयुक्त शुभा बी. यांनी बुधवारी थेट आरोग्य विभागाच्या वरिष्ठ महसूल निरीक्षकांनाच कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ज्या व्यावसायिकांनी मनपाचा व्यापार परवाना घेतला नाही किंवा त्याचे नूतनीकरण केले नाही, त्यांनी तातडीने ते करून घ्यावे, अन्यथा संबंधितांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा सज्जड इशारा दिल्याने शहरातील विनापरवाना व्यावसायिकांकडून नूतन परवाना घेण्यासह नूतनीकरण करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. महापालिकेच्या मुख्य कार्यालयासह विविध विभागीय कार्यालयांमध्ये नवीन व्यापार परवाना मिळविण्यासह जुना परवाना नूतनीकरण करून घेण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली आहे. त्याचबरोबर परवाना मिळविण्यासाठी ऑनलाईन व्यवस्थाही महापालिकेकडून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे लोकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले जात आहे. कारवाईच्या धास्तीने गुरुवारी एका दिवसात व्यापार परवान्यांच्या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत तब्बल 2 लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे.