समुद्रात बुडणाऱ्या विदेशी महिलेला वाचविले
कारवार : जिल्ह्यातील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुर्डेश्वर येथे चार शालेय विद्यार्थिनी समुद्रात बुडून मृत्यू पावल्याची घटना ताजी असताना जिल्ह्यातील सुप्रसिद्ध श्रीक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोकर्णजवळच्या कुडले बीचवर समुद्रात बुडणाऱ्या विदेशी महिलेला जीवरक्षकांनी वाचविल्याची घटना घडली आहे. जीवरक्षकांनी वाचविलेल्या विदेशी पर्यटक महिलेचे नाव दनये (वय 73) असे आहे. त्या फ्रान्समधून पर्यटनासाठी गोकर्ण परिसरात दाखल झाल्या आहेत. कुडले बीचवर पर्यटनाच्या निमित्ताने वास्तव्य करुन असलेल्या दनये पोहण्यासाठी अरबी समुद्रात उतरल्या होत्या. त्यावेळी त्या समुद्र लाटेच्या विळख्यात सापडल्या आणि जीव वाचविण्यासाठी आरडा ओरडा करु लागल्या. घटनेची माहिती मिळताच जीवरक्षक नागेंद्र कुरले, प्रदीप अंबीग आणि प्रवासी मित्र शेखर हरीकंत्र यांनी विदेशी महिलेला वाचविले.