विदेशी चलन साठ्यात 3.709 अब्ज डॉलर्सची घट : रिझर्व्ह बँक
वृत्तसंस्था/ मुंबई
देशाच्या विदेशी चलन साठ्यामध्ये घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. 3.709 अब्ज डॉलरने घसरत देशाचा विदेशी चलन साठा 701 अब्ज डॉलर्सवर आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या संदर्भातली माहिती दिली आहे.
4 ऑक्टोबरला संपलेल्या आठवड्यात देशाचा विदेशी चलन साठा 3.71 अब्ज डॉलरने कमी होत 701.18 अब्ज डॉलर्सवर घसरला आहे. या आधीच्या आठवड्यामध्ये देशाचा विदेशी चलन साठा तब्बल 12.58 अब्ज डॉलर्सने वाढून 704.88 अब्ज डॉलर्स या सर्वकालिक उच्चांकावर पोहोचला होता.
सुवर्ण साठ्यातही घट
यासोबत सुवर्ण साठ्यातही घसरण अनुभवायला मिळाली आहे. देशाचा सुवर्ण साठा 4 ऑक्टोबरच्या आठवड्यामध्ये 4कोटी डॉलरने घसरून 65.75 अब्ज डॉलर्सवर राहिला होता.
विदेशी गुंतवणूकदारांनी 58 हजार कोटी काढले
याचदरम्यान विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत 58,711 कोटी रुपये शेअरबाजारातून काढून घेतले असल्याची माहिती आहे. इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव, व्रुड तेलाच्या किंमतीत झालेली वाढ तसेच चीनमधील बाजारांची दमदार कामगिरी या कारणास्तव विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून पैसे काढून घेण्यावर भर दिला. याआधी सप्टेंबरमध्ये बाजारात विदेशी गुंतवणूकदारांनी 57,724 कोटी रुपये गुंतवले होते.