विदेश अन् संरक्षण मंत्र्यांची हत्या
चीन अध्यक्षांचे शुद्धीकरण अभियान : अमेरिकेसाठी हेरगिरी केल्याचा संशय
वृत्तसंस्था /बीजिंग
चीनमध्ये एका मागोमाग एक अनेक अधिकारी आणि मंत्री गायब होत आहेत. चीनचे माजी विदेशमंत्री किन गँग गायब झाल्यावर चीनचे माजी संरक्षण मंत्री ली शांगफू यांच्यासोबत अनेक उच्चस्तरीय अधिकारी गायब झाले आहेत. परंतु एका वृत्तानुसार चीनने गँग यांचा प्रचंड छळ करून त्यांची हत्या केली आहे. गँग हे दीर्घकाळापासून गायब होते, ते कुठे आहेत याविषयी कुठलीच माहिती मिळू शकलेली नाही. तसेच चीनच्या सरकारकडून याविषयी कुठलीच टिप्पणी करण्यात आलेली नाही. शेकडो अधिकारी बेपत्ता झाल्यावर चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग हे रशियाचे एकेकाळचे हुकुमशहा स्टॅलिन यांच्याप्रमाणे ‘शुद्धीकरण’ मोहीम राबवत आहे. किन गँग यांच्यासह माजी संरक्षणमंत्री ली शांगफू तसेच अनेक उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा ब्रिटिश वृत्तपत्र द सनने केला आहे. चीनमध्ये सध्या सुरक्षेची पातळी अत्यंत अधिक कठोर झाली आहे.
अशा स्थितीत तेथे नेमके काय घडतेय हे जाणणे जवळपास अशक्य आहे. याचदरम्यान चिनी अधिकारी गायब होण्याच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. यामुळे अध्यक्ष जिनपिंग यांच्यावर क्रौर्य कृत्यांचा आरोप होत आहे. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्याप्रमाणेच स्वत:च्या विरोधकांना संपविण्याचे सत्र जिनपिंग यांनी आरंभिल्याचे बोलले जात आहे. चीनचे विदेशमंत्री किन गँग आणि संरक्षणमंत्री ली शांगफू हे गायब होणे हे याचे सर्वात हायप्रोफाइल उदाहरण आहे. या दोघांनाही जिनपिंग यांचे निष्ठावंत मानले जात होते. किन यांना जुलै 2021 मध्ये अमेरिकेतील राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले होते. यानंतर केवळ 18 महिन्यांनी त्यांची विदेशमंत्री म्हणून नियुक्ती झाली होती. परंतु विदेशमंत्री झाल्याच्या 6 महिन्यांमध्येच किन हे गायब झाले होते. किन हे अमेरिकेसाठी हेरगिरी करत होते अशी वदंता आहे. यातूनच किन गँग यांना ठार करण्यात आल्याचे मानले जात आहे. या सर्व घडामोडींमुळे चीनमध्ये राजकीय उलथापालथ सुरू आहे. किन हे जून महिन्याच्या अखेरीस गायब झाले होते.