आरसीयूच्या ‘त्या’ प्राध्यापकाला सक्तीची निवृत्ती
बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठात गुरुवारी झालेल्या विशेष सिंडिकेट बैठकीत संशोधन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून मार्गदर्शक प्राध्यापकाला सक्तीची निवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे आरसीयूचे कुलगुरु प्रा. सी. एम. त्यागराज यांनी सांगितले. गुरुवारी शहरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, गेल्या महिन्यात झालेल्या दीक्षांत समारंभात एका संशोधन विद्यार्थिनीने दीक्षांत समारंभाचे प्रमाणपत्र न मिळाल्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त पसरले आहे.
या संदर्भात एक विशेष सिंडिकेट बैठक बोलाविण्यात आली होती. प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने त्यांना राज्यपालांनी प्रमाणपत्र दिले नाही. विद्यार्थिनीने यापूर्वी लैंगिक छळाबद्दल तक्रार दाखल केली होती. काही दिवसांनी ती तक्रार मागे घेतली. तथापि, आरोप सिद्ध झाल्याने मार्गदर्शकाला निलंबित करण्यात आल्याचे ते म्हणाले. विद्यार्थिनीने अर्ज करून निर्धारीत शुल्क भरले तर तिला दीक्षांत समारंभ प्रमाणपत्र दिले जाईल. या घटनेचा तिच्या कारकिर्दीवर परिणाम होऊ नये म्हणून तिच्या चुकीबद्दल तिला माफ करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आल्याचे ते म्हणाले. यावेळी आरसीयूचे सिंडिकेट सदस्य रफी भंडारी व इतर उपस्थित होते.