कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कुणासाठी? स्वत:साठी...

06:22 AM Dec 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

त्यादिवशी सकाळीच शालिनीताई भेटायला आल्या. साधारणपणे पन्नाशीकडे झुकलेल्या. बघितल्या बरोबरच त्यांच्यातील अस्वस्थता स्पष्टपणे जाणवत होती. आमच्या फॅमिली डॉक्टरांनी तुम्हाला भेटायला सांगितलं म्हणून आले. त्यांच्या मते माझी डोकेदुखी मानसिक आहे. साऱ्या तपासण्या करून झाल्या, सगळे रिपोर्टस् नॉर्मल आहेत पण काही केल्या ही डोकेदुखी थांबत नाही. रोजच्या कामांचा धड उरका होत नाहीये. विचारांनी डोक्याचा नुसता भुगा झालाय असं म्हणत त्या रडायला लागल्या.

Advertisement

थोड्या वेळाने पुन्हा बोलू लागल्या. पुढील अर्धा तास त्या बोलतच होत्या. मीही त्यामध्ये कोणताही व्यत्यय न आणता अगदी लक्षपूर्वक त्यांचं बोलणं ऐकत होते. बोलता बोलता उल्हसीत होऊन स्वत:च्या लहानपणीच्या गोष्टी, शाळा भावंड, परीक्षा, खेळ, मैत्रिणी, बक्षिसं, आपल्या आजूबाजूची मंदिरं, तिथे होणारी भजने, लग्न, नवरा, सासू-सासरे, मुलं बाळ ते आजपर्यंतच्या आठवणी गुंफत राहिल्या. त्या बोलत असताना मी अनेक महत्त्वाच्या गोष्टी माझ्या डायरीमध्ये टिपून घेतल्या. एकूणच त्यांच्या बोलण्यातून तीव्र चिंता जाणवत होती. वर्षभराने निवृत्त होणारा नवरा, पेन्शन नसणारी नोकरी, लग्नाची मुलगी आणि शिकत असलेला त्यांचा मुलगा आणि या सगळ्यातच रजोनिवृत्तीचा काळ! मुळातच संपूर्ण आयुष्याकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन आणि त्याला सगळं असलेलं असं हे पोषक वातावरण त्यामुळे चिंतेचं पीक उगवलं नसतं तरंच नवल!

Advertisement

लहानपणी त्यांच्या घराजवळ मंदिरात खूप भजन-कीर्तने त्यांनी ऐकली होती. खरंतर त्यांचा आवाज छान होता, त्या स्वत: गाणं शिकल्याही होत्या पण गेले काही वर्ष संसारव्यापात हे सगळं त्यांनी गुंडाळून ठेवलं होतं. बारीकसारीक गोष्टी मनाला लावून घेणे लहान-सान गोष्टींची चिंता करणं, अस्वस्थ होणं, पटकन रडू येणं, एकाकी वाटणं अशा विचारांच्या आणि भावनांच्या आवर्तनात सापडून त्यांनी डोकेदुखी ओढवून घेतली होती. त्यातच रजोनिवृत्तीचा काळ असल्याने त्याची लक्षणे अधिक वाढती झाली होती. अती चिंतेमुळे त्यांच्यात एक प्रकारची निक्रियता आली होती. सगळा वेळ बऱ्याचदा काळजी करण्यातच जात होता.

शालिनी ताईची समस्या आणि तिचे उत्तर समोर दिसत होतं. जोपर्यंत घरामध्ये सासू-सासरे होते, मुलं लहान होती तोवर सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात वेळ कसा जायचा ते कळायचं नाही. उलट वेळच मिळायचा नाही. आता मुलंही मोठी झाली होती. घराबाहेर पडली होती. सासू-सासरे नव्हते. त्यामुळे वेळच वेळ अशी स्थिती होती. जसा रिकामा वेळ भरपूर होता तशीच आता कुणाला फारशी गरज उरली नाही ही मनात पोकळी निर्माण करणारी भावनाही वाढीस लागली होती. जोडीला चिंता काळजी हे सगळं होतंच. शालिनीताई काही काळ समुपदेशनासाठी येत राहिल्या. धारणा, मूल्य तपासात एक कृती आराखडा तयार करण्यात आला. स्वगताची तर्कशुद्ध छाननी, सजगतेची काहीतंत्र हे सारं आत्मसात करत शालिनीताईंची गाडी हळूहळू रुळावर येत होती. या सगळ्यातून बाहेर पडण्याचा आणखी एक उपाय मी त्यांना सुचवला. घरच्या घरी तुम्ही गाण्याचे, भजनाचे क्लास सुरू करा. त्यांनीही ते मनावर घेतलं आणि त्यांच्या आयुष्याला एक प्रयोजन लाभलं. सुरुवातीला लहान मुलं गाण्याच्या क्लासला येऊ लागली. नंतर नंतर भजन शिकण्यासाठी बायकांची ये-जा सुरू झाली, थोडे विषय बदलले, संवाद सुरू झाला. आपण उपयुक्त आहोत आणि काहीतरी करू शकतो ही भावना शालिनीताईंचा स्वत:कडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक करायला बळ देऊन गेली. शालिनीताईंची केस सविस्तर मांडली कारण ती प्रातिनिधिक स्वरूपाची आहे. अशा अनेक स्त्रिया आपल्याला पाहायला मिळतात. ताण, चिंता, भीती, नैराश्य, आत्मविश्वासाचा अभाव, संशय अशा नकारात्मक भावनांसकट वर्षांनुवर्षे जगत असतात. तर काहीजणी राग, संताप, सूड, द्वेष अशा अनेक विघातक भावनांसकट उभं आयुष्य रेटत राहतात. एका मर्यादेपर्यंत अशा भावनांसकट सामान्य आयुष्य जगता येतं. वरील भावना सौम्य प्रमाणात असतील तर दैनंदिन जीवन जगताना हा अडथळा येणार नाही परंतु त्याची तीव्रता, वारंवारता, कालावधी हे मात्र वाढत गेलं तर मात्र मानसिक आरोग्य बिघडण्याबरोबरच शारीरिक आरोग्यसुद्धा बिघडू लागतं. अलीकडच्या काळामध्ये मानसिक आरोग्याच्या प्रश्नांचा आलेख उंचावताच आहे. त्यामध्ये स्त्रियांच्या मानसिक आरोग्याचे प्रश्नही वाढते आहेतच. अनेकदा समायोजन क्षमता कमी असल्यामुळे समस्या वक्र रूप धारण करतात. आजही जेंडर रोलचा पगडा कमी झाला आहे असे जरी आपण म्हटले तरीही स्त्राr कितीही शिकलेली कमावती असली तरी काही पारंपारिक भूमिकांपासून तिची पूर्णपणे सुटका नसते. जसं एकदम आलेलं रितेपण त्रासदायक ठरतं तसंच घर आणि नोकरी ही डबल ड्युटी सांभाळतानाही दमछाक होते. ताणतणाव हा शब्द तसा सर्वांच्या परवलीचा झाला आहे.

अगदी परवाचीच गोष्ट! एका नातेवाईकांकडे गेलेले असताना त्या सोसायटीतल्या एक आजी भेटल्या. परिचय तसा जुनाच.

कशा आहात आजी? खूप दिवसांनी भेट झाली.

हो अगं! मी छान आहे बघ! आता काय रिटायरमेंट झाली. निवांत आहे. गेली काही वर्षे माझ्या आवडीनिवडींना वेळ देते आहे. मंदिरात जाते, भजनांमध्ये रमते. पुस्तक वाचते. थोडं विणकाम करते. वेळ छान जातोय. एका काठावरती उभं राहून घरच्यांची जगण्यासाठी चाललेली लढाईही बघते आहे. माझ्या मुलाची नोकरी उत्तम आहे पण करिअरचे जिने चढत असताना होणारी दमछाक, कसरत, नोकरी आणि घर दोन्ही सांभाळून भरतनाट्याम शिकणाऱ्या माझ्या सुनेची होणारी धावपळ, दहावी आणि बारावीतल्या नातवंडांची एकेका मार्कांसाठीची लढाई बघून आतल्या आत कुठेतरी अस्वस्थ व्हायला होतं बघ.

अपेक्षा जास्त ठेवल्या की अपेक्षाभंगाचे दु:ख आहेच! काही वेळा चिडचिड होते, एकमेकांचे राग एकमेकांवर काढले जातात. आजकाल कुणाच्या आयुष्यात स्वस्थताच उरली नाही! आजींचं हे वाक्य अंतर्मुख करून गेलं. अतिशय गतिमान आणि तीव्र स्पर्धेच्या काळात दैनंदिन जीवनात जगताना ताण-तणावांना संघर्षाला तोंड देताना आज अनेकांची स्वास्थ्य शब्दाशी फारकत होताना दिसते.

अपेक्षाभंग झाला तर चिडचिड करणं हा स्वभाव धर्म बनतो. कुठल्याही गोष्टीवर रागावणं, चिडणं, संतापणं, कटकट करणे अशा प्रतिक्रिया दिल्या जाऊन स्वत:च्या आणि इतरांच्या आयुष्यातील आनंद, सुख, समाधान, शांती ही सगळी चतु:सूत्री हरवून जाते. विख्यात मानसोपचार तज्ञ डॉक्टर एन. सी. सूर्य यांनी मानसिक आरोग्याची केलेली व्याख्या खूप महत्त्वाची वाटते, या त्यांनी तीन गोष्टी सांगितल्या आहेत.

  1. तुम्ही स्वत:शी स्वस्थ असला पाहिजेत.
  2. इतरांना तुमच्या सानिध्यात स्वस्थ वाटलं पाहिजे.

3.तुम्ही स्वत:मधील दोष, उणिवा शोधून त्या दूर करत राहिलं पाहिजे.

खरंच या गोष्टीविषयी आपण जर सजग असलो तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतील.

अर्थात या विषयी अधिक जाणून घेऊया पुढच्या लेखात...

-अॅड. सुमेधा देसाई

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article