महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

प्रथमच धनुष्यबाण, काँग्रेसविना निवडणूक!

06:31 AM Apr 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. धनुष्यबाण, काँग्रेसविना होणाऱ्या या निवडणूक रिंगणात एकूण 9 उमेदवार असून खरी लढत भाजप आणि ठाकरे सेनेचे विनायक राऊत यांच्यातच होणार हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही. विद्यमान खासदार विनायक राऊत विजयाची हॅट्ट्रिक साधतात की नारायण राणे बाजी मारतात, हे पाहावे लागणार आहे. चित्र स्पष्ट झाल्याने पुढील दिवसात आता दोन्ही बाजुकडून प्रचाराची रणधुमाळी रंगणार आहे. समस्त कोकणवासियांचे या लढतीकडे लक्ष लागून राहिले आहे. 

Advertisement

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मात्र खरी लढत महायुतीचे भाजपचे उमेदवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध महाविकास आघाडीचे ठाकरे सेनेचे उमेदवार, खासदार विनायक राऊत यांच्यातच होणार आहे. या निवडणुकीत सलग तीनवेळा विजय मिळवून खासदार राऊत आपल्या विजयाची हॅट्ट्रिक करणार की नारायण राणे खासदार राऊत यांच्या विजयाच्या हॅट्ट्रिकला ब्रेक लावणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ही निवडणूक अतिशय चुरशीची आणि तेवढीच वैशिष्ट्यापूर्ण ठरणार आहे. यामध्ये पहिल्यांदाच काँग्रेस पक्ष आणि धनुष्यबाण या मतदारसंघातील निवडणुकीत दिसणार नाही, हेही या निवडणुकीचे वैशिष्ट्या.

Advertisement

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कुणीच माघार न घेतल्याने सर्व नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. 72 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेस पक्ष निवडणूक रिंगणात नाही. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणातून धनुष्यबाण निशाणीसुद्धा यावेळी दिसणार नाही. भाजपची कमळ निशाणी पहिल्यांदाच या मतदारसंघात दिसणार आहे, तर एकेकाळी शिवसेनेत एकमेकांचे सहकारी असणारे राणे व राऊत एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. अशा अनेक मुद्द्यांनी ही निवडणूक वैशिष्ट्यापूर्ण ठरत आहे.

महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे, इंडिया आघाडीकडून विद्यमान खासदार विनायक राऊत, वंचित बहुजन आघाडीकडून मारुती जोशी, बहुजन मुक्ती पार्टीचे अशोक पवार, बसपाचे राजेंद्र आयरे, कोकण प्रादेशिक पक्षाचे शकील सावंत, अपक्ष उमेदवार अमृत तांबडे, सुरेश शिंदे, विनायक लवू राऊत हे निवडणूक रिंगणात आहेत. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी हे भाजपचे मातब्बर नेते प्रचारसभा घेणार आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे प्रचारसभा घेणार आहेत. त्यामुळे निवडणूक प्रचाराचा धुरळा उडणार आहे.

या मतदारसंघाचे विद्यमान खासदार राऊत हे ठाकरेंसोबत राहिल्याने महाविकास आघाडीतून त्यांना उमेदवारी मिळणार हे अगोदरच निश्चित होते. मात्र महायुतीकडून कुणाला उमेदवारी मिळते, याकडे लक्ष लागून होते. महायुतीमध्ये भाजप व शिंदे सेनेकडूनही उमेदवारीसाठी मजबूत दावा केल्याने महायुतीत उमेदवारीवरून तिढा निर्माण झाला होता. अखेर भाजपने या मतदारसंघात आपली ताकद वाढल्याचा दावा करून भाजपच्या पारड्यात ही जागा मिळवून घेतली आणि नारायण राणेंना उमेदवारी देण्यात आली. मात्र भाजपकडे ही जागा जाताच कोकणचा बालेकिल्ला असलेल्या शिवसेनेची धनुष्यबाणाची निशाणी मात्र गायब झाली. 1996 सालच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला सुरेश प्रभू यांच्या रुपाने धनुष्यबाण या निशाणीवर पहिला विजय मिळाला. त्यानंतर शिवसेनेचे प्राबल्य या मतदारसंघावर कायम राहिले. मात्र 2024 च्या निवडणुकीत पहिल्यांदाच धनुष्यबाण निवडणूक रिंगणातून बाहेर गेला आहे. तर आजवरच्या इतिहासात भाजप प्रथमच या मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहे.

धनुष्यबाणाप्रमाणे काँग्रेस पक्षही या मतदारसंघातून यावेळी निवडणूक रिंगणात नाही. 1952 साली झालेल्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून ते 2019 मध्ये झालेल्या सतराव्या निवडणुकीपर्यंत सतत काँग्रेस पक्ष कोकणातील निवडणूक रणांगणात लढत होता. काहीवेळा हा पक्ष जिंकला, तर बऱ्याचवेळा हरला देखील. मात्र 2024 च्या निवडणुकीत पहिल्यांदाच काँग्रेस पक्ष मैदानाबाहेर आहे. तसेच 1991 सालच्या निवडणुकांपासून सतत गेली 32 वर्षे रिंगणात असलेली धनुष्यबाण निशाणीही निवडणूक रिंगणाबाहेर गेली आहे.

ही लोकसभा निवडणूक भाजपचे कमळ निशाणी विरुद्ध ठाकरे सेनेची मशाल निशाणी यांच्यात होणार आहे. म्हटलं तर दोन्ही निशाणी या लोकसभा मतदारसंघासाठी नवीन आहेत. त्यामुळे मतदारांपर्यंत पक्ष चिन्ह कशा पद्धतीने पोहोचविणार, त्यावर दोन्ही बाजूंचे यशापयश अवलंबून राहणार आहे.

दोन्ही उमेदवार अनुभवी, तगडे असल्याने अशा या वैशिष्ट्यापूर्ण लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार, हे पाहणे देखील वैशिष्ट्यापूर्ण ठरणार आहे. कारण महाविकास आघाडीकडून लढणारे विद्यमान खासदार राऊत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून सलग दोनवेळा विजयी झाले आहेत. त्यामुळे आता 2024 च्या निवडणुकीत ते विजयी झाले, तर त्यांची विजयाची हॅटट्रिक होणार आहे, हे निश्चित. पण तसे होते का हे पाहण्यासाठी 4 जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. दुसरीकडे नारायण राणे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण मतदारसंघातून पराभूत झाले होते. त्यानंतर मुंबईत वांद्रे येथेही विधानसभा निवडणुकीतही पराभूत झाले होते. त्यामुळे राणे यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे.

आणखी एक विशेष म्हणजे राणे व राऊत हे शिवसेनेत असताना एकेकाळचे सहकारी होते. 2005 मध्ये राणे सेनेतून बाहेर पडल्यानंतर ते राजकीय वैरी झाले आणि आज एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्याचबरोबर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राणेंना पराभूत करण्यासाठी पुढाकार घेणारे शिंदे सेनेचे मंत्री दीपक केसरकर राणेंना लोकसभेवर निवडून आणण्यासाठी यावेळी प्रचारात पुढाकार घेत आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतही तेच झाले आहे.

7 मे रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी प्रत्येक उमेदवाराकडून केला जाणारा प्रचार, त्यांच्या मित्र पक्षाकडून मिळणारी साथ आणि नवे पक्षचिन्ह लोकांपर्यंत पोहोचविण्यात ते कितपत यशस्वी होतात, यावरच त्यांची निवडणुकीत सरशी होणार की नाही हे ठरणार आहे. कोण किती जोर लावतो, त्यावर सगळंकाही अवलंबून आहे. एकूणच वैशिष्ट्यापूर्ण ठरलेल्या या निवडणुकीच्या निकालातही काही वैशिष्ट्या असणार का, याचे उत्तरही 4 जूनलाच मिळणार आहे. तोपर्यंत उत्सुकता मात्र ताणली जात आहे, हे नक्की.

संदीप गावडे

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article