‘धर्म’ संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे..?
मास्कमॅनचीच सातत्याने चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणावरून कर्नाटकात सुरू असलेले आरोप प्रत्यारोप लक्षात घेता या प्रकरणाचा शेवट कसा असणार आहे? खरोखरच धर्मस्थळवरील आरोप निराधार आहेत का? की या आरोपांमध्ये तथ्य आहे? याचा उलगडा होण्यासाठी एसआयटी चौकशीचा अहवाल येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
चित्रदुर्ग येथील रेणुकास्वामी खून प्रकरणी चित्रपट अभिनेते दर्शन व त्याची मैत्रीण पवित्रा गौडा यांच्यासह सात संशयितांना कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेला जामीन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी दर्शनसह सात जणांना पुन्हा अटक करून कारागृहात धाडण्यात आले आहे. खून प्रकरणी अटकेत असताना बेंगळूर येथील परप्पन अग्रहार कारागृहात दर्शनची बडदास्त ठेवण्यात आली होती. त्याचे फोटो समाजमाध्यमावर व्हायरल झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान गांभीर्याने निरीक्षणे नोंदविली आहेत. कारागृहात संशयितांची बडदास्त ठेवलात तर याद राखा, असा इशाराच प्रशासनाला दिला आहे. कोणत्याही गंभीर गुन्हेगारी प्रकरणात आरोपींना जामीन मंजूर करताना कोणती पथ्ये पाळावीत? याचा कानमंत्रही न्यायमूर्ती जे. बी. परदीवाला व न्या. आर. महादेवन यांच्या न्यायपीठाने दिले आहेत. दर्शनची मैत्रीण पवित्रा गौडा हिला अश्लील मेसेज पाठविला म्हणून रेणुकास्वामी याचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आला होता. गेल्या वर्षी जूनमध्ये ही घटना घडली होती. 11 जून रोजी दर्शनला अटक करण्यात आली होती. 30 ऑक्टोबर रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने त्याला सहा आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. 13 डिसेंबर रोजी जामीन मंजूर झाला होता.
कर्नाटकातील प्रसिद्ध धार्मिक ठिकाण असलेल्या धर्मस्थळ प्रकरणावरून संघर्ष सुरूच आहे. गेल्या काही वर्षांपासून धर्मस्थळविरुद्ध आरोपांचे सत्र सुरूच आहे. सौजन्या खून प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. पोलीस, सीबीआयकडून चौकशी होऊनही खऱ्या गुन्हेगारांपर्यंत तपास यंत्रणांना पोहोचता आले नाही. आता विधिमंडळ अधिवेशनातही धर्मस्थळ प्रकरणावरून सत्ताधारी व प्रमुख विरोधी पक्ष यांच्यात खडाजंगी झाली आहे. गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी अत्यंत स्थितप्रज्ञ अवस्थेत विधानसभेत या प्रकरणावरून उत्तरे दिली आहेत. 3 जुलै 2025 रोजी धर्मस्थळमध्ये अनेक बलात्कार व खून झाले आहेत. खून प्रकरणातील मृतदेह आपणच पुरले आहोत, असे सांगत एक मास्कमॅन पोलीस स्थानकात दाखल झाला. त्याने दिलेल्या तक्रारीवरून दुसऱ्या दिवशी एफआयआर दाखल करण्यात आले. राज्य महिला आयोगाच्या विनंतीवरून मुख्यमंत्री सिद्धरामय्या व गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली आहे. आयपीएस अधिकारी प्रणव मोहंती यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीने मृतदेहांच्या अवशेषांच्या शोधासाठी धर्मस्थळ परिसरातील पंधराहून अधिक ठिकाणी खोदाई केली आहे. यापैकी दोन ठिकाणी हाडे सापडली आहेत.
मुळात मास्कमॅनच्या सांगण्यावरून दिसेल तेथे खोदाई करण्याचा प्रकारच चुकीचा आहे, असे सांगत मास्कमॅनचीच चौकशी करावी, त्याची नार्को चाचणी करावी, हिंदू धार्मिक ठिकाणे बदनाम करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हे प्रकार सुरू झाले आहेत, असा आरोप विधानसभेत झाला. विधानसभेबाहेरही भाजप व धर्मस्थळच्या भक्तांनी रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे. प्रथमच धर्मस्थळचे धर्माधिकारी वीरेंद्र हेगडे यांनी या आरोपांसंबंधी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. धर्मस्थळवरील आरोप बिनबुडाचे आहेत. ते खोटे आहेत. खोट्या आरोपांमुळे आपल्याला दु:ख झाले आहे. शेवटी विजय सत्याचाच होतो, एसआयटीची चौकशी चालू द्या, चौकशीअंती तरी सत्य परिस्थिती उघडकीस येणार आहे, असे सांगत त्यांनी एसआयटी चौकशीचे स्वागतच केले आहे. एसआयटीने गेल्या दोन-तीन दिवसांपासून खोदाई बंद ठेवली आहे. मास्कमॅनचीच सातत्याने चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणावरून कर्नाटकात सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप लक्षात घेता या प्रकरणाचा शेवट कसा असणार आहे? खरोखरच धर्मस्थळवरील आरोप निराधार आहेत का? की या आरोपांमध्ये तथ्य आहे? याचा उलगडा होण्यासाठी एसआयटी चौकशीचा अहवाल येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
धर्मस्थळच्या मुद्द्यावरून कर्नाटकात युट्यूबर्स आणि मुख्य वाहिनीतील टीव्ही चॅनेल्स यांच्यामध्ये जणू युद्धच सुरू झाले आहे. टीव्ही चॅनेलविरुद्ध युट्यूबर्स सतत एकतर्फी प्रसिद्धीचा आरोप करीत आहेत. विधिमंडळाच्या अधिवेशनात या मुद्द्यावरही चिंता व्यक्त केली आहे. खोदाई दरम्यान दोन ठिकाणी हाडे सापडली आहेत. तपासणीसाठी ती विधिविज्ञान प्रयोगशाळेत पाठविली आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतरच खरी चौकशी सुरू होणार आहे. तोपर्यंत सहकार्य करावे, आपण कोणाच्या बाजूने किंवा विरोधात नाही. सत्य काय आहे? हे लोकांना कळावे. धर्मस्थळवर होत असलेले आरोप खोटे असतील तर चौकशीअंती ते आणखी उजळून निघणार आहे. तोपर्यंत धीर धरा, युट्यूबवर कोणाचीही बदनामी होईल, असा आततायी प्रचार थांबवा, अशी विनंती गृहमंत्री डॉ.जी.परमेश्वर यांनी केली आहे. सौजन्या खून प्रकरणाच्या चौकशीसाठी सुरू असलेल्या आंदोलनातील आघाडीचे नेते महेश शेट्टी तिमरोडी यांना अटक झाली आहे. भाजपचे राष्ट्रीय नेते बी. एल. संतोष यांच्यावरील टीकेमुळे त्यांना अटक झाली आहे. ज्या मास्कमॅनमुळे या प्रकरणाला केवळ देशातच नव्हे तर विदेशी मीडियामध्येही धर्मस्थळची चर्चा झाली, त्या मास्कमॅनच्या पत्नीनेच तो विकृत आहे, तो जे बोलतो आहे ते खोटे आहे, असे सांगितले आहे. सुजाता भट्ट नामक एका महिलेने आपली मुलगी अनन्या भट्टचा खून झाल्याचा आरोप केला होता. तिने अनन्याचा आहे म्हणून दाखवलेला फोटो भलत्याच महिलेचा असल्याचे समोर आले आहे. धर्मस्थळ प्रकरणाला रोज एक नवी कलाटणी मिळते आहे. एसआयटीच्या चौकशीत सत्य बाहेर पडेलच. तोपर्यंत धर्मस्थळची बदनामी थांबायला हवी.