भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी जि. पं. समोर आंदोलन
बेळगाव : रामदुर्ग तालुक्यातील ग्रा. पं. कडून राबविण्यात आलेल्या विकासकामांमध्ये भ्रष्टाचार करण्यात आला आहे. याबाबत जि. पं. कडे पुरावा देऊनही संबंधितांकडून भ्रष्टाचाराची रक्कम वसूल न करता पाठीशी घालण्यात येत आहे. भ्रष्टाचारात गुंतलेल्यांवर कारवाई करून रक्कम वसूल करावी, अशी मागणी करत रामदुर्ग तालुक्यातील नागरिकांकडून जि. पं. प्रवेशद्वारात आंदोलन करण्यात आले. रामदुर्ग तालुक्यात येणाऱ्या मुद्देनूर, ओबळापूर या ग्रा. पं. मध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. रामदुर्ग तालुका पंचायतीच्या 37 ग्रा. पं. च्या लेखा परीक्षणातून ही बाब उघड झाली आहे. लेखा परीक्षणाच्या माध्यमातून 28 कोटी भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. संबंधितांवर गुन्हा दाखल करून रक्कम वसूल करणे गरजेचे आहे. मात्र ता. पं. अधिकारी पी. एम. साली यांच्या वर्तनामुळे भ्रष्टाचार दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.