निळ्या डोळ्यांच्या अपत्यासाठी...
आपण छान दिसावे, म्हणून बरेच प्रयत्न करत असतो, ही वस्तुस्थिती आहे. विविध प्रकारची सौंदर्यप्रसाधने, तेले, तर तो उपयोगात आणतोच. पण स्वत:वर शस्त्रक्रियाही करुन घेतल्या जातात. काही साधनांचा उपयोग करुन डोळ्यांचे रंग परिवतर्तीत पेले जातात. जे आपल्याला जन्मत: मिळालेले नाही, ते अशाप्रकारे कृत्रिमरित्या मिळविण्याचा आणि मिरविण्याचा माणसाचा प्रयत्न असतो.
तथापि, आपल्याला सुंदर मुले व्हावीत, यासाठी मातेने शस्त्रक्रिया करुन घेण्याचा अद्भूत प्रकार नुकताच रशियात घडला आहे. निदान, तसा दावा करण्यात आला आहे. रशियातील एका महिलेला आपल्या अपत्याच्या डोळ्यांचा रंग निळाच हवा होता. यासाठी तिने ती गर्भवती होण्यापूर्वी एक उपाय केला. तिने एक शस्त्रक्रिया करुन आपल्या स्वत:च्या डोळ्यांचा रंग निळा करुन घेतला. त्यानंतर ती गर्भवती झाली. तिला पुत्र झाला, तो निळ्या डोळ्यांचा निपजला होता. आपण आपल्या डोळ्यांचा रंग निळा केला. म्हणून आपल्या पुत्राचेही डोळे निळे आहेत, असे या महिलेचे म्हणणे आहे. तथापि, हे प्रतिपादन पूर्णत: असत्य आणि चुकीचे आहे, असे जनुकीय तज्ञांचे मत आहे. माणसाच्या डोळ्याच्या बुबुळाचा रंग त्यांच्या जनुकीय संरचनेवर ठरत असतो. केवळ मातेने गर्भारपणापूर्वी स्वत:च्या डोळ्यांचा रंग पालटला किंवा अन्य काही परिवर्तने स्वत:मध्ये कृत्रिमरित्या किंवा स्वत:वर शस्त्रक्रिया करुन करुन घेतले, म्हणून अपत्यांमध्ये ते उतरतील अशी अपेक्षा करण्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. कर्मधर्मसंयोगाने असे क्वचित घडत असले, तरी माणसाने स्वत:मध्ये कृत्रिम परिवर्तन करुन घेतले, तरी तो आपली जनुकीय संरचना परिवर्तित करु शकत नाही. त्यामुळे त्याच्या अपत्यामध्ये मातापित्यांची कृत्रिम वैशिष्ट्यो उतरत नाहीत. त्यामुळे असे स्वत:वर प्रयोग कोणी करु नयेत. त्यांचा मुलांवर परिणाम होऊ शकत नाही. उलट, अशास्त्रीय पद्धतीने असा प्रयोग स्वत:वर केल्यास त्याचा घातक परिणाम होऊ शकतो. रशियाच्या महिलेचे हे उदाहरण या संबंधात महत्वाचे आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. डॉक्टरांकडून या संबंधात सर्वांना हा महत्वाचा इशाराही देण्यात आला आहे.