तब्बल २९ वर्षे छोट्या मॅटवरच मल्लांचा सराव
क्रीडा प्रबोधिनीतील कुस्ती केंद्राची स्थिती : प्रशस्त मॅट हॉल बांधण्याकडे सपशेल दुर्लक्ष, केंद्रात २० पैकी ९ मल्लच करताहेत मेहनत, आंतरराष्ट्रीय नियमांनुसार कुस्ती करणे अशक्य, ११ मल्लांनी केंद्रात मल्लविद्या शिकणे नाकारले
कोल्हापूरः संग्राम काटकर
कोल्हापुरातील क्रीडा प्रबोधिनीला फुटबॉल प्रशिक्षण केंद्राला मंजुरी मिळाल्याच्या आनंदात सगळेच आहे. परंतू प्रबोधिनीतीलच कुस्ती प्रशिक्षण केंद्रातील गैरसोयीमुळे मल्ल मात्र दु:खी आहेत. ते दु:ख सांगत नाही कारण त्यांना केंद्रातच राहून कुस्ती शिकायची आहे. केंद्रात सरावासाठी १२ बाय १२ मीटरचा मॅट असणे जरुरी आहे. परंतू १० बाय ७ मीटर इतकी छोटी मॅट आहे. क्रीडा प्रबोधिनीत कुस्ती केंद्र सुरू होऊन २९ वर्षे उलटूनही मोठा मॅट हॉल करण्यासाठी विचार झालेली नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्टॅडर्डनुसार केंद्रातील मल्लांना सराव करताना अडचणी येत आहेत. खेलो इंडिया एक्सलन्स कुस्ती सेंटरचे मल्लही केंद्रातच येतात. त्यामुळे ना केंद्रातील ना सेंटरमधील मल्लांना चांगला सराव करता येतोयअशी सद्यस्थिती आहे.
छत्रपती शिवाजी स्टेडियममधील पॅव्हेलियनमध्ये १९९६ सालापासून क्रीडा प्रबोधिनीचे कार्यालय आहे. तेव्हापासून या कार्यालयाच्या खालच्या मजल्यावरील छोट्याशा जागेत कुस्ती निवासी प्रशिक्षण केंद्र सुरू आहे. केंद्रासाठी लागणारी जागा प्रशस्त असावी असा त्यावेळी विचार झाला नाही. आणि आता २९ वर्षे उलटली तरीही जागा शोधण्यासाठी प्रयत्न होत नाही. परंतू त्याचे दुष्परिणाम सध्या दिसत आहेत. केंद्रात किमान २० मल्ल प्रशिक्षण घेण्यासाठी असणे आवश्यक आहे. परंतू सध्या नऊच मल्ल निवासी पद्धतीने केंद्रात मेहनत करताहेत. उर्वरीत ११ जण चाचणीतून प्रवेश मिळूनही केंद्रात सरावासाठी न जाता इतरत्र गेले आहेत. मल्ल इतरत्र का गेले हे गांभिर्याने पाहिले तर केंद्रात असलेली छोटीशी मॅट हे पहिले कारण डोळ्यासमोर आले आहे. या मॅटवर एकाच वेळी चार मल्ल्यांच्या जोड्यावर कुस्तीचा सराव कऊ शकत नाहीत. कुस्ती करताना एखादी जोडी जर आक्रमक झाली की ती दुसऱ्या मल्लांच्या जोडीवर कोसळून अथवा धडकून कुस्तीचा मौसम तुटण्याच्या जास्ती शक्यता आहे. शिवाय मॅटवर मोठा राऊंड झोन नसल्याने मल्लांना आंतरराष्ट्रीय नियमानुसार कुस्ती करता येत नाही. अशी सद्यस्थिती असतानाच खेलो इंडिया एक्सलन्स कुस्ती सेंटरचे मल्लही कुस्ती केंद्रात येत आहेत. आधीच केंद्रातील मल्लांना कुस्ती करताना अडचणी येत आहेत. अशातच खेलो इंडिया सेंटरमधील मल्लांचा त्यांना व्यत्यय जाणवतोय, अशी सद्यस्थिती आहे.
आजवर जी चुक होत राहिली, ती आगामी काळातही होऊ नये यासाठी क्रीडा प्रबोधिनीने कुस्ती केंद्रासाठी मोठी जागा शोधावी अशी कुस्तीतील जाणकारांची अपेक्षा आहे. या जागेत दोन मॅट बसतील असा प्रशस्त हॉल बांधावा. सध्या क्रीडा प्रबोधिनीकडे १२ फुट ऊंद व १२ मीटर लांबीची मॅट आहे. शासनाकडून आणखी एक मॅट मिळवून दोन्ही मॅट हॉलमध्ये टाकण्यात याव्यात. दोन मॅटवर एकाचवेळी अनेक मल्लांच्या जोडींना कुस्तीचा सराव चांगल्या पद्धतीने करता येईल, शिवाय त्यांना कुस्तीचा मौसमही टिकवणे शक्य होईल. इतकेच नव्हे तर मोठ्या हॉलमध्ये व्यायामाच्या आधुनिक सुविधाही करणेही शक्य होईल. यासाठी क्रीडा प्रबोधिनीनेच पाठपुरावा करावा लागेल. मोठा मॅट हॉल व आधुनिक व्यायाम साहित्य मिळवण्यासाठी हालचाली होणार नाहीत, तोपर्यंत छोट्याशा मॅटवरच मल्लांना कुस्तीचे धडे घ्यावे लागतील हे उघड आहे, असे कुस्तीतील जाणकारच सांगताहेत.
विभागीय क्रीडा संकुलातच मॅट हॉल बांधावा...
सध्या मोतिबाग तालीममध्ये जसा मोठा मॅट हॉल आहे तसा हॉल छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलात बांधणे शक्य आहे. संकुलात प्रवेश करताना डाव्या बाजूला असलेली दोन एक जागा तशी पडीकच आहे. या पडीक जागेत जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळवून मोठा मॅट हॉल बांधता येईल. त्यासाठी कुस्तीतील जाणकार व क्रीडा प्रबोधिनीने पुढाकार घेणे आवश्यक आहे. एकदा हॉल उभारला की त्यात आधुनिक व्यायामशाळआही करता येईल.