Satara News : बिबट्या दिसलेल्या परिसरात ठशांची शोधमोहीम
बिबट्या दिसलेल्या परिसरात ठशांची शोधमोहीम राबवण्यात आली.
कराड : कराड तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले सदाशिवगडावर शुक्रवारी रात्री बिबट्याचा वावर असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर रविवारी वन विभागाने सदाशिवगडाची पाहणी केली. बिबट्या दिसलेल्या परिसरात ठशांची शोधमोहीम राबवण्यात आली.
दरम्यान, सदाशिवगड परिसरातील राजमाची व सुर्ली घाट परिसरात यापूर्वीही बिबट्याचे दर्शन झाले असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. किल्ले सदाशिवगडावर सदाशिवाचे मंदिर आहे. कराड शहरासह सदाशिवगड परिसरातल अनेक लोक दररोज व्यायाम व सदाशिवाच्या दर्शनासाठी गडावर येत असतात.
पायथ्यापासून गडावरील मंदिरापर्यंत स्ट्रीट लाईटची व्यवस्था असल्याने पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत गडावर नागरिकांची वर्दळ सुरू असते. अशातच शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता सदाशिव मंदिराच्या पाठीमागे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला होता. गडावर बिबट्याचा वावर असल्याने सदाशिवगड विभागात खळबळ उडाली होती.
याची माहिती मिळाल्यानंतर वनरक्षक सविता कुट्टे व वनसेवक शंकर शिंदे यांनी सदाशिवगडावर जाऊन पाहणी केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या दिसलेल्या ठिकाणी ठशांचा शोध घेण्यात आला. सदाशिवगड परिसरातील राजमाची व सुर्ली घाट या परिसरात यापूर्वीही बिबट्याचा वावर आढळून आला आहे. सदाशिवगड ते सागरेश्वर अभयारण्य दरम्यान असलेली अखंड डोंगर रांग, दाट झाडी यामुळे या परिसरात नेहमीच वन्यप्राण्यांचा
वावर असतो. या भागात बिबट्याला भक्ष्य उपलब्ध होत असल्याने बिबट्याचा वावर या परिसरात आहे. सदाशिवगडाच्या पाठीमागे असलेले दाट जंगल बिबट्याचा अधिवास आहे. बिबट्या एका जागेवर रहात नाही. त्यामुळे नागरिकांनी भिण्याची गरज नाही. मात्र गडावर जाताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन वन विभागामार्फत करण्यात आले आहे.