कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक परंपरेच्या पाऊलखुणा

10:43 AM Nov 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गोव्यातून बेळगावात-समादेवी गल्लीच्या उगमाची कहाणी : एकोप्याने राहण्याची परंपरा

Advertisement

अमित कोळेकर, बेळगाव

Advertisement

कोणत्याही गावाची सीमा त्या गावाच्या हद्दीवरून निश्चित केली जाते. त्यानुसार, बेळगावची प्राचीन सीमा आताच्या समादेवी गल्लीपासूनच सुरू होत असे. शहराच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेली ही गल्ली, खडेबाजार रस्त्याला जोडलेली आहे. पश्चिमेला कॉलेज रोडवरील यंदे खुटापासून सुरू होणारी ही गल्ली समादेवी मंदिरापर्यंत येऊन संपते. यंदे खुटाकडून गल्लीत प्रवेश करताच सर्वप्रथम श्री माऊती मंदिर नजरेस पडते. त्याच्या पुढे उजवीकडे केळकर बाग, डावीकडे गोंधळी गल्ली, तर गल्लीतून पुढे गेल्यास शेवटी उजवीकडे रामदेव गल्ली आणि डावीकडे नार्वेकर गल्ली जोडलेली आहे. बेळगावचे मुख्य व्यापारी केंद्र असलेल्या खडेबाजारात प्रवेश करण्यासाठी समादेवी गल्लीतूनच पुढे जावे लागते. सध्या या गल्लीचा समावेश महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 7 मध्ये होतो.

स्थलांतराचा रोचक इतिहास

सुमारे दोन-अडीचशे वर्षांपूर्वी, म्हणजे इसवी सन 1800 च्या सुमारास,गोव्यात पोर्तुगीजांचे राज्य असताना त्यांनी स्थानिक जनतेवर धर्मांतराचा दबाव टाकण्यास सुऊवात केली. या अत्याचारांना विरोध करताना गोव्यातील नागरिकांनी अनेक यातना सहन केल्या आणि अखेर त्यांनी परराज्यात स्थलांतर करण्यास सुऊवात केली. दक्षिणेकडे स्थायिक होण्यासाठी या कुटुंबांचे दल पुढे निघाले होते, प्रवासादरम्यान विश्र्रांतीसाठी ते बेळगावातील या परिसरात थांबले. त्यांच्यासोबत बैलगाड्या आणि नदीतील मोठे दगड आणले होते, ज्यांची ते आपल्या देवतांप्रमाणे पूजा करीत असत.

काही काळानंतर प्रवास पुढे सुरू करण्याचा प्रयत्न झाला असता बैलगाड्या जागच्या हलल्या नाहीत. याला दैवी संकेत मानून त्यांनी इथेच वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गोव्यामधील डिचोली तालुक्मयातील नार्वे या गावातील नार्वेकर वैश्यवाणी समाजातील काही कुटुंबे अशा परिस्थितीत बेळगावात येऊन समादेवी गल्ली शेजारी असणाऱ्या नार्वेकर गल्लीत स्थायिक झाली. काही दिवसांनी या समाजाने येथे मंदिर बांधले आणि सीमादेवीची प्रतिष्ठापना केली. पुढे उच्चारातील बदलांमुळे ‘सीमादेवी’चे ‘समादेवी’ असे नामकरण रुढ झाले. याच मंदिरामुळे गल्लीला ‘समादेवी गल्ली’ हे नाव मिळाले.

भूतकालीन रचना व लोकजीवन

पूर्वी समादेवी गल्लीतील बहुतांश नागरिक ब्राह्मण आणि लिंगायत समाजाचे होते. त्यानंतर मराठा आणि इतर समाजाचीही काही घरे अस्तित्वात आली. सर्वांनी एकोप्याने राहण्याची परंपरा टिकवून ठेवली. या परिसरातील अनेकांचे उदरनिर्वाह विविध व्यापारांवर अवलंबून होते. तसेच हिंडलगा परिसरात काहींची शेतीही होती. ज्याद्वारे ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत. या गल्लीला जोडलेल्या केळकर बाग या गल्लीत छोटेशी भाजी मंडई असून शहरात खरेदीसाठी येणारी मंडळी, शेतातून आलेली ताजी भाजी घेऊनच घरी परततात. मात्र सध्या जागेअभावी येथील भाजीविव्रेते समादेवी गल्ली परिसरात भाजी विक्री करताना दिसून येतात.

श्री पंत वाड्याचा रंजक इतिहास आणि श्र्रद्धास्थान 

समादेवी गल्लीत असलेला श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांचा ऐतिहासिक ‘श्री पंत वाडा’ किंवा ‘श्री पंत कॉम्प्लेक्स’ म्हणून ओळखला जाणारा हा वाडा आजही भव्यतेने उभा आहे. इसवी सन 1905 नंतर श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांच्या देहावसानानंतर 1911 साली त्यांचे बंधू श्री गोविंद दादा पंत आणि श्री गोपाळ दादा पंत यांनी हा वाडा विकत घेतला. या वाड्यात पूर्वी 1995 पर्यंत तब्बल 25 खोल्या होत्या, मोठाले पटांगण होते, वाड्याच्या समोर आणि मागील बाजूस पिण्याच्या पाण्याची विहीर होती, ज्याचं पाणी अमृतासारखं गोड होत. 1995 सालानंतर या वाड्याचे नूतनीकरण करण्यात आले. आता या वाड्यात कमर्शियल कॉम्प्लेक्स उभे राहिले असून तळमजल्यावर श्री पंत बाळेकुंद्री महाराजांचे मंदिर असून, नित्यनेमाने येथे पूजाअर्चा केली जाते. चार मजली आणि दहा हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या वाड्यात बाळेकुंद्री कुटुंबाची तिसरी पिढी सध्या वास्तव्यास आहे. समोर समादेवी गल्ली आणि मागील बाजूस गोंधळी गल्लीला संलग्न असा हा भव्य वाडा आहे. श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांच्या कार्याची परंपरा जपत या वाड्यात वर्षभर सर्व सण व उत्सव उत्साहात साजरे केले जातात. त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे श्री पंत महाराज यांचा वाढदिवस हा गोकुळाष्टमीचा. त्यामुळे गोकुळाष्टमीच्या दिवशी श्री पंत महाराज यांचा जन्मोत्सव येथे मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो. याप्रसंगी बेळगावसह, मुंबई, पुणे, गोवा, कोल्हापूर, सांगली, सातारा अशा असंख्य भागातून भक्तमंडळी आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवितात. याबद्दल अधिक माहिती आपल्याला ‘तऊण भारत न्यूज’ या युट्यूब चॅनेलवरील ‘समादेवी गल्ली-माझं वेणुग्राम’ या मालिकेतून ऐकायला आणि पाहायला मिळेल.

धार्मिक व सामाजिक परंपरा

समर्थ श्री रामदास स्वामी यांच्या शिष्याच्या हस्ते या समादेवी गल्लीतील श्री मारुती मंदिराची स्थापना झाल्याचे स्थानिक ज्येष्ठांचे म्हणणे आहे. या मंदिरात वर्षभर धार्मिक कार्यक्रम होत असतात. या गल्लीतील सार्वजनिक उत्सव मंडळाच्यावतीने श्री गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

‘माझं वेणुग्राम’मालिकेतून उलगडतील बेळगावच्या ऐतिहासिक गल्ल्यांच्या कहाण्या

‘माझं वेणुग्राम’ या विशेष मालिकेद्वारे बेळगावच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वारशाने नटलेल्या गल्ल्यांच्या कहाण्या उलगडल्या जात आहेत. या मालिकेतून वाचकांना शहरातील प्रत्येक गल्लीचा आत्मा, तिचं गतवैभव, परंपरा आणि लोकजीवन अनुभवता येईल. प्रत्येक भागात बेळगावच्या सांस्कृतिक आणि वारशाची नवी पानं उघडली जातील. ही मालिका केवळ इतिहासाचा मागोवा घेणारी नाही, तर आजही संस्कृतीचा दीप जपणाऱ्या गल्ल्यांचा सन्मान करेल. वाचकांनी आणि प्रेक्षकांनी ‘तरुण भारत न्यूज’ या यूट्यूब चॅनेल, तरुण भारत न्यूज बेळगाव या फेसबुकवर तसेच दैनिक आवृत्तीत या मालिकेचे भाग पाहावेत.

‘तरुण भारत चौक’ ते आताचा ‘स्वामी विवेकानंद चौक’ - एक प्रवास 

समादेवी गल्लीमधल्या श्री माऊती मंदिराशेजारील इमारतीत एकेकाळी दैनिक ‘तरुण भारत’ वृत्तपत्राचे जुने कार्यालय होते. त्यामुळे चौकाला त्याकाळी ‘तरुण भारत चौक’ अशी ओळख होती. कालांतराने ‘तरुण भारत’ वृत्तपत्र कार्यालय पुढे नार्वेकर गल्लीत स्वत:च्या जागेत स्थलांतरित झाल्यानंतर या चौकाचे नामकरण ‘स्वामी विवेकानंद चौक’ असे करण्यात आले, अशी माहिती येथील जाणकार सांगतात.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article