Kolhapur Football: खेळाडूंच्या मारामारीमुळे फुटबॉल हंगाम बदनाम, खिलाडूवृत्ती गमावल्याचा आरोप
खिलाडूवृत्ती गमावल्यामुळे एकमेकांना मारामारी करण्यापर्यंत मजल जाते
By : संग्राम काटकर
कोल्हापूर : यंदाच्या कोल्हापूरी फुटबॉल हंगाम हा दर्जेदार खेळामुळे नव्हे तर विविध संघांमधील खेळाडूंनी सामन्यांतील एकमेकांना केलेल्या मारामारीमुळे गाजला आहे. गेल्या दीड दशकात खेळाडूंनी कधी नाही इतकी मारामारी करुन फुटबॉल परंपरेला बदनामही केले आहे.
खिलाडूवृत्ती गमावल्यामुळे एकमेकांना मारामारी करण्यापर्यंत मजल जाते, अशी टिका फुटबॉलप्रेमी करत आहेत. त्यांनी ज्या त्यावेळी सोशल मीडियावरुन भावनाही व्यक्त केल्या होत्या. पण तरीही त्याच्याशी आमचा संबंधच नाही, असे दाखवून देत खेळाडूंनी सामन्यात एकमेकांना मारामारी केला जाते. त्याबद्दल खेळाडूंना रेडकार्ड दाखवले गेले.
केएसएने तर सामन्यात मारामारी करणाऱ्या खेळाडूंना ठराविक सामने खेळण्यास बंदी केली. परंतू या बंदीचीही खेळाडूंना भीती राहिली नाही, याला आता काय म्हणायचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यंदाच्या फुटबॉल हंगामात सात फुटबॉल स्पर्धा झाल्या. या स्पर्धांमधून लाखो रुपयांची बक्षीसेही लावली गेली. उत्कृष्ट खेळाडूंची चांदी होईल, अशी हजारो रुपयांची बक्षीसही लावली होती.
पाटाकडील तालीम मंडळ (अ) संघाने ४, खंडोबा तालीम मंडळाने २ व शिवाजी तरुण मंडळाने १ स्पर्धा जिंकून रोख रकमेची बक्षीसे मिळवली. स्पर्धा विजेतेपदाचे या संघांनी धडाक्यात आनंदोत्सव साजरा केला. संयुक्त जुना बुधवार पेठ संघाने तर हंगामात बलाढ्य संघांना हरवत दबदबा निर्माण करताना चंद्रकांत चषकात उपविजेतेपदही मिळवले.
आठ वर्षांनंतर मिळालेल्या या उपविजेतेपदाचे फुटबॉलप्रेमी कौतुकही केले. ही संघांची जमेची बाजू असली तरी चेंडूवर नियंत्रण घेतेवेळी अचानक केलेले मारामारीचे प्रकार नजरअंदाज करण्यासारखे नक्कीच नाहीत. खेळाडूंचे एकमेकांच्या अंगावर धाऊन जाण्याच्या प्रकारांवर कडक शब्दात उमटलेली टीकेची झोड आजही कायम आहे.
या मारामारीच्या प्रकारांना खेळाडूच जबाबदार आहेत, असे नाही. ज्या संघांमधील खेळाडूंनी मारामारी केली त्या संघाचे अध्यक्ष, प्रशिक्षक व व्यवस्थापकही मारामारीला जबाबदार आहेत, असेही फुटबॉलप्रेमींचे म्हणणे आहे. पदाधिकाऱ्यांकडून खेळाडूंचे योग्य पद्धतीने कौन्सिलिंग केले असते तर मारामारीचे प्रकार घडलेच नसते असेही माजी खेळाडू उघडउघड बोलत आहे. सामन्यात चुरस, ईर्ष्या असलीच पाहिजे. परंतू मारामारी आम्हाला मान्य नाही, असे माजी खेळाडूंची आणि फुटबॉलप्रेमींचे मत आहे.
उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शिवाजी तरुण मंडळ व पाटाकडील तालीम मंडळ (अ) संघातील खेळाडूंनी केलेल्या मारामारीतून जणू एकमेकांविरुद्धची खुन्नसच चव्हाट्यावर आणली. केएसएनेही मारामारीची गंभीर दखल घेऊन शिवाजी मंडळाच्या संकेत नितीन साळोखे व पाटाकडीलच्या ओंकार शिवाजी मोरेला फुटबॉल हंगाम संपेपर्यंत फुटबॉल स्पर्धेतील सामने खेळण्यास बंदी केली.
शिवाय एकमेकांच्या अंगावर धाऊन गेलेल्या शिवाजी मंडळाच्या ४ खेळाडूंना आणि पाटाकडीलच्या ५ खेळाडूंना पुढील चंद्रकात चषक फुटबॉल स्पर्धेतील २ सामने खेळण्यास मनाई केली. हा सारा प्रकार शिवाजी मंडळ व पाटाकडीलच्या खेळाडूंच्या अंगलट आला होता. आगामी स्पर्धेतील सामन्यांमध्ये खेळाडूंनी गैरवर्तन केले तर कारवाई अटळ असून त्याचा परिणाम संघांना भोगावा लागेल असा इशाराही केएसएने दिला होता.
मारामारीला गंभीर घेत मुख्य पंच खेळाडूंना रेडकार्ड दाखवत आहेत. केएसए खेळाडूंना सामने खेळण्यास बंदी करत आहेत, याची माहिती असूनही शनिवारी झालेल्या शारंग चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चेंडूवर नियंत्रण घेतेवेळी संयुक्त जुना बुधवार पेठचा खेळाडू सचिन मोरेने शिवाजी मंडळाच्या दर्शन पाटील यांच्यात अंगावर धाऊन गेला.
या प्रकाराची मुख्य पंचांनी गंभीर दखल घेऊन सचिनला रेडकार्ड दाखवून मैदानाबाहेर केले. एकदंरीत फुटबॉल हंगामातील मारामारीवर केएसएने कडक कारवाई करावी, त्याशिवाय खेळाडूंमध्ये सुधारणा होणार नाही, असे फुटबॉलप्रेमी बोलून दाखवत आहेत.
खेळाडूंना आवर घालणे महत्वाचे
"सर्व संघांमधील खेळाडूं व समर्थकांना आपआपसातील खुन्नस बाजूला ठेवून कोल्हापूरचा फुटबॉल कसा वाढले याकडे गांभियनि पहावे. खेळाडूंकडून सामन्यात मारामारीचा प्रकार होणे अपेक्षीत नाही. असे सतत होत राहिले तर ते कोल्हापुरी फुटबॉलच्या भवितव्यासाठी हानिकारक आहे. मुळाच कोल्हापूरी फुटबॉल हा कोल्हापूर पुरताच मर्यादीत राहत आहे. तेव्हा खेळाडूंनी डिसीप्लिन पाळत सामना खेळण्याबर लक्ष केंद्रीत करावे. संघाच्या ऑफिशिअल्सनही खेळाडूंना आवर घालणे महत्वाचे आहे."
- अमोल जयसिंग पाटील, सरवार तालीम