महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भोजनाची पंगत...राजकारणात रंगत

06:30 AM Nov 03, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कर्नाटकात सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन होऊन सहा महिने उलटले नाहीत तोच सरकार पडण्याची नि पाडण्याची चर्चा होऊ लागली आहे. ही चर्चा घडवून आणण्यात काही भाजप नेते आघाडीवर असले तरी काँग्रेसमधील अंतर्गत लाथाळ्या लक्षात घेता या चर्चेला बळ मिळत आहे.

Advertisement

अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्री बदलणार की नाही? याविषयी आता काँग्रेसच्या हायकमांडलाच  स्पष्ट माहिती द्यावी लागणार आहे. ती अद्याप त्यांनी दिली नाही. अडीच वर्षांनंतर सिद्धरामय्या पायउतार होणार, डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होणार, याविषयी सुरू असलेल्या चर्चेवर काँग्रेस नेतृत्वाने आजवर आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळेच कर्नाटकातील गोंधळात भरच पडत आहे. विरोधकांत सुरू असलेली चर्चा  सोडून दिली तरी काँग्रेसमधील वेगवान घडामोडी सरकारमध्ये आणि पक्षामध्ये सर्व काही ठीक नाही, हेच दर्शवतात. गेल्या आठवड्यात गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसह काही निवडक मंत्र्यांसाठी भोजनावळीचे आयोजन करण्यात आले होते. या जेवणावरूनही राजकारण रंगले आहे.

Advertisement

मुख्यमंत्री सिद्धरामय्या, समाजकल्याणमंत्री डॉ. एच. सी. महादेवप्पा आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी या प्रमुख नेत्यांनी जेवणावळीत भाग घेतला होता. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना यापासून दूर ठेवण्यात आल्याचे दिसून आले. सतीश जारकीहोळी यांनी डी. के. शिवकुमार यांच्या बेळगावातील वाढत्या हस्तक्षेपाबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर जेवणावळीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी प्रमुख मंत्र्यांशी चर्चा केली आहे. तर दुसरीकडे डी. के. शिवकुमार समर्थक नेते अडीच वर्षांनंतर शिवकुमार मुख्यमंत्री होणार, असा डांगोरा पिटत आहेत. यावरून काँग्रेसमधील सत्तासंघर्ष आता छुपा राहिला नाही, हे दिसून येते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हीच वेळ साधून पुन्हा दलित मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेचा मुद्दा टेबलावर मांडला आहे. गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या निवडक मंत्र्यांच्या बैठकीत याच मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती सामोरी आली आहे. कर्नाटकात अडीच वर्षांनंतर जर नेतृत्वबदल झालाच तर दलित नेत्याला मुख्यमंत्री करा, ही मागणी पुढे रेटण्याचे ठरविण्यात आले आहे.

दलित नेत्यांना मुख्यमंत्रीपद देण्याचे ठरले तर आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाला त्याचा फायदाच होणार आहे आणि मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून डी. के. शिवकुमार यांना सहजपणे बाजूला सारता येणार आहे, असे यामागचे गणित आहे. बेळगावच्या राजकारणातील हस्तक्षेपावरून सतीश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. याचवेळी काँग्रेसमधून बाहेर पडून भाजप सत्तेवर येण्यासाठी ‘ऑपरेशन कमळ’ राबविलेले माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी काँग्रेस सरकार किती दिवस टिकणार? याविषयी भविष्यकथन केले आहे. बेळगावात सलग दोन दिवस पत्रकार परिषद घेऊन कर्नाटकातील काँग्रेस सरकार खूप दिवस टिकणार नाही, असे सांगितले आहे. यावरून 135 आमदारांचे संख्याबळ असलेले विद्यमान सरकार पाडविण्यासाठी पुन्हा ऑपरेशन सुरू झाले आहे का? असा संशय बळावला आहे. आम्ही ‘ऑपरेशन कमळ’ राबविणार नाही, भाजपला ऑपरेशनची गरजही नाही, तरीही महाराष्ट्राच्या धर्तीवर कर्नाटकात सत्ताबदल होऊ शकतो, असे भाकितही त्यांनी व्यक्त केले आहे.

रमेश जारकीहोळी आणि डी. के. शिवकुमार यांच्यातील राजकीय वैर सीडी प्रकरणावरून वाढले आहे. त्यामुळेच उपमुख्यमंत्र्यांवर रोज हल्लाबोल करीत रमेश जारकीहोळी यांनी आपण स्वस्थ बसलो नाही, हे दाखवून दिले आहे. माजी मुख्यमंत्री एम. वीराप्पा मोईली यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी नेतृत्वबदलाची चर्चा थांबवा, पक्षाच्या हितासाठी ही चर्चा योग्य नाही, असे स्पष्ट केले आहे. स्वत: प्रदेशाध्यक्ष व उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनीही याविषयीची चर्चा थांबविण्याची सूचना दिल्यानंतरही ही चर्चा सुरूच आहे. वाढत्या चर्चेनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही नेतृत्वबदलावर प्रतिक्रिया देत यासंबंधी हायकमांडच निर्णय घेईल, असे स्पष्ट केले आहे. रमेश जारकीहोळी यांचे वक्तव्य लक्षात घेता महाराष्ट्राच्या पातळीवर कर्नाटकात राजकीय घडामोडींची तयारी सुरू आहे का? असा संशय बळावतो आहे. कर्नाटकात एकनाथ शिंदे कोण ठरणार? अजितदादांची भूमिका कोणता नेता वठवणार? याचीही उत्सुकता लागली आहे. सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले तर त्यांचे समर्थक नेते सरकार टिकू देणार नाहीत, हेच सुचवण्याचे प्रयत्न रमेश जारकीहोळीनी केले आहेत.

एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-निजद युती सरकारचे पतन बेळगावच्या राजकीय संघर्षामुळेच झाले. आता तसाच संघर्ष बेळगावात पुन्हा सुरू झाला आहे. या संघर्षाचा केंद्रबिंदू पूर्वीप्रमाणेच डी. के. शिवकुमार हेच आहेत. शिवकुमार यांनी मात्र या सर्व घडामोडींवर उत्तर देणे टाळले आहे. आपल्याला करण्यासाठी खूप कामे आहेत, असे सांगत या संघर्षावर पांघरुण घातले आहे. निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिले आहे. त्यांच्या आशा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला कामे करायची आहेत, असे सांगतानाच आपल्याविरुद्ध सुरू असलेल्या टीकेला उत्तर देणार नाही, हेच त्यांनी अधोरेखित केले आहे. रमेश जारकीहोळी यांनी मात्र उघडपणे शिवकुमार यांच्यावर टीका सुरू केली आहे. सीडी प्रकरण चौकशीसाठी सीबीआयकडे सोपविण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासंबंधी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे मेलद्वारे अर्ज दिल्याचेही रमेश यांनी सांगितले आहे. सीडी प्रकरणात आपल्याला अडकविण्यात आले. या हनीट्रॅपमागे डी. के. शिवकुमार आणि कंपनीच आहे. हे प्रकरण सीबीआयकडे गेले तरच त्यांचे पितळ उघडे पडणार आहे. यासाठी आपला लढा सुरू राहणार आहे, असे रमेश यांनी स्पष्ट केले आहे. बेळगावातील राजकीय संघर्ष पूर्वीप्रमाणेच सरकारच्या मुळावर उठणार का? हे पहावे लागणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article