हिरेकोडीत मोरारजी शाळेत पुन्हा अन्नातून विषबाधा
14 विद्यार्थी अत्यवस्थ : 3 विद्यार्थ्यांवर निवासी शाळेत उपचार सुरू
चिकोडी : हिरेकोडी येथील मोरारजी निवासी शाळेत अन्नातून विषबाधा होऊन 14 विद्यार्थी अस्वस्थ झाले. रविवारी रात्रीच्या जेवणानंतर हा प्रकार घडला असून सरकारी व खासगी रुग्णालयात उपचार करून विद्यार्थ्यांवर शाळेतच आरोग्य खात्याच्या विशेष पथकाकडून उपचार सुरू केले आहेत. याबाबत माहिती अशी की, दीड महिन्यापूर्वी अन्नातून विषबाधा बाधा होऊन 120 विद्यार्थी अत्यवस्थ झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा त्याच शाळेत हा प्रकार घडला आहे. रविवारी रात्री जेवणानंतर काही विद्यार्थ्यांना उलटी सुरू झाल्याने वॉर्डन व सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सरकारी व खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. सकाळी प्रकृती ठीक झाल्याने त्यांना डिस्चार्ज घेऊन शाळेतच उपचार सुरू केले आहेत.दीड महिन्यापूर्वी घडलेल्या घटनेत 15 दिवस अनेक विद्यार्थी दवाखान्यात उपचार घेत होते. तर दहाहून अधिक विद्यार्थी बेळगावात उपचार घेऊन कित्येक दिवसांनी प्रकृती सुधारल्यावर शाळेत दाखल झाले आहेत.
त्यातच पुन्हा अशी घटना घडल्याने ही शाळा चर्चेत आली आहे. गेल्याच महिन्यात अशाप्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी कायदा सेवा समितीच्या अध्यक्ष या नात्याने स्वत: दोन न्यायाधीशांनी निवासी शाळेची पाहणी केली होती. त्यावेळी तेथे अनेक गैरसोयी आढळून आल्या होत्या. विशेष करून स्वच्छता व विद्यार्थ्यांचे साहित्य यावरून शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. हिरेकोडी येथील या निवासी शाळेत 428 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याबाबत माहिती मिळताच डीडीपीआय आर. एस. सीतारामू,तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी रवीकुमार हुक्केरी यांच्यासह अल्पसंख्याक विभागाचे अधिकारी, आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. हिरेकोडी येथील 14 विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटल्याने रात्री उपचार करून तब्येत सुधारल्यावर डिस्चार्ज दिला आहे. सध्या निवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपचारासाठी आरोग्य खात्याचे पथक तैनात केले असून तेथेच उपचार केले जात असल्याची माहिती तालुका वैद्याधिकारी डॉ. राजेंद्र खणदाळे यांनी दिली.
आरोग्य खात्याच्या पथकाची शाळेत नियुक्ती
आरोग्य खात्याच्या एका पथकाची शाळेत नियुक्ती केली असून विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात आले आहे. 14 विद्यार्थ्यांपैकी 11 विद्यार्थ्यांवर सरकारी रुग्णालयात व तीन विद्यार्थ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार करून सर्व विद्यार्थ्यांवर आता निवासी शाळेतच उपचार सुरू केले आहेत.